‘जे काही झाले त्याबद्दल सॉरी, अल्लू अर्जुन सुटकेनंतर काय म्हणाला?
तेलंगणा उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आज (14 डिसेंबर) सकाळी साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनची हैदराबाद सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली. यावेळी अल्लू अर्जुनचे वडील आणि सासरे त्याला घेण्यासाठी आले होते. अल्लू अर्जुन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या चाहत्याने आनंद साजरा केला. तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह घरी पोहोचला आहे. घरी पोहोचल्यानंतर त्याने सर्व चाहत्यांचे प्रेम आणि समर्थनाबद्दल आभार मानले.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, काळजी करण्यासारखे काही नाही. मी ठीक आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. हे प्रकरण कोर्टात सुरू आहे, त्यामुळे मी यादरम्यान भाष्य करणार नाही. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. पोलिसांना सहकार्य करेन.”
पीडितेच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करताना अल्लू अर्जुन म्हणाला की, ”ज्या महिलेने आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबाप्रती माझी संवेदना आहे. ही दुर्दैवी घटना होती. या कठीण काळात कुटुंबाला शक्य तितक्या सर्व प्रकारे पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना शक्य ते सर्व सहकार्य करण्यासाठी मी तिथे असेन.”
या घटनेबद्दल बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला की, ”हे अनावधानाने घडले आहे. मी चित्रपट पाहायला गेलो होतो, तेव्हा अचानक ही घटना घडली. हे हेतुपूर्वक करण्यात आलेलं नाही. गेली 20 वर्षे मी सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात जात आहे. हा नेहमीच एक सुखद अनुभव राहिला आहे, पण यावेळी परिस्थितीने वेगळे वळण घेतले. जे काही झाले त्याबद्दल मी सॉरी बोलतो.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List