कथा एका चवीची – माझ्या गोव्याच्या भूमीत…
>> रश्मी वारंग
नाताळ म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ. जगभरात साजऱ्या होणाऱ्या या सणात विविध खाद्य परंपरा जपल्या जातात. भारतात नाताळचे नाते गोव्याशी आहे. 450 हून अधिक वर्षे पोर्तुगीजांचे राज्य असणाऱ्या या प्रांतात जगभरातल्या संस्कृतींचा मिलाफ असणारे पदार्थ जन्माला येणे स्वाभाविकच होते. गोव्यातल्या नाताळ विशेष खवय्येगिरीची ही ऊबदार खमंग झलक.
थंडीचं नातं खवय्येगिरीशी आहे. बाहेर कडाक्याची थंडी पडल्यानंतर घरात चमचमीत खाण्याचा मोह होतोच. अशात डिसेंबर महिन्यात येणारा नाताळ म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ. जगभरात साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी विविध खाद्य परंपरा जपल्या जातात. भारतात नाताळचे नाते गोव्याशी आहे. 450 हून अधिक वर्षे पोर्तुगीजांचे राज्य असणाऱ्या या प्रांतात जगभरातल्या संस्कृतींचा मिलाफ असणारे पदार्थ जन्माला येणे स्वाभाविकच होते. गोव्यातल्या नाताळ विशेष खवय्येगिरीची ही ऊबदार खमंग झलक.
नाताळच्या दिवशी गोव्यामध्ये पूर्ण उत्साह आणि आनंदाचे वातावरण असले तरी खवय्येगिरीची तयारी काही दिवस आधीपासून सुरू होते. यातला महत्त्वाचा सोरपोटेल हा गोवन पदार्थ पोर्तुगीजांकडून आला आणि रुजला. या नावाचा शब्दश अर्थ म्हणजे गोंधळ. विविध पदार्थांचा वापर करून बनवण्यात आलेला हा पदार्थ म्हणजे एक प्रकारचा ‘गोंधळ’च. मांसाचे तुकडे विविध प्रकारे मसाले लावून मुरवले जातात. काही ठिकाणी व्हिनेगरचा वापर होतो. जुन्या काळी मांसासोबतच त्या प्राण्याच्या रक्ताचाही वापर त्या पदार्थात केला जायचा जे आता कमी झाले आहे. गोव्यामध्ये हे सोरपोटेल सान्ना नावाच्या भातापासून बनवलेल्या पावसदृश पदार्थाबरोबर खाल्ले जाते. गोव्यातील या ख्रिसमस विशेष मांसाहारी पदार्थांना हे पाव, पोई, सान्ना खऱया अर्थाने रंगत आणतात. नाताळ विशेष पदार्थांमध्ये या पावांचे महत्त्वही विलक्षण आहे.
नाताळात खास करून घरी बनवले जाणारे छोटे छोटे गोड पदार्थ आपला गोडवा आणि लोकप्रियता आजही बाळगून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मॅझिपॅन. वास्तविक हा मूळचा तुर्की पदार्थ. पण भारतामध्ये प्रवेश करणाऱया अनेक परदेशी खलाशांसाठी गोवा हा विशेष प्रांत होता. त्यामुळे विविध संस्कृतींची सरमिसळ गोवन खाद्यपदार्थांमध्ये झालेली दिसते. मॅझिपॅन या मूळ पदार्थांमध्ये साखर आणि बदाम यांचा वापर केला जायचा. पण गोव्यात आढळणारे काजूचे मुबलक प्रमाण पाहता इथे बनणाऱया मॅझीपॅनमध्ये बदाम, काजू आणि साखर यांचा सम प्रमाणात वापर होतो. साच्यातून काढल्या जाणाऱया या गोड पदार्थाला प्राणी, पक्षी, फुले असे वेगवेगळे आकार दिले जातात.
नाताळमध्ये बनणारा आणखी एक पारंपरिक पदार्थ म्हणजे पिनाग. थोडक्यात वर्णन करायचे झाले तर कोकणात मिळणाऱया तांदळाच्या पिठाचे लाडू आणि पिनाग जवळपास सारखेच. फक्त गोवन त्यात काळ्या गुळाचा वापर करत असल्याने रंग तपकिरी होतो. गूळ, नारळ आणि तांदळाचे पीठ यापासून हा पदार्थ बनतो. गोल आकाराऐवजी सॉसेजेसच्या आकारामध्ये हे पिनाग बनवले जातात. सध्या कुकीज किंवा गोलाकार आकारांमध्येही ते बनतात.
फक्त ख्रिसमसमध्ये बनवला जाणारा गोवन पदार्थ म्हणजे पेराड. पोर्तुगीजमध्ये यालाच ‘गोईबादा’ असे म्हटले जाते. पिकलेले पेरू, दालचिनी पावडर, लोणी यांचा वापर करून हा गोड पदार्थ तयार होतो. पीठ, तूप, साखर, अंडी, रवा आणि नारळाचं दूध अशा पदार्थांना एकत्र करून बनणारा अतिशय चविष्ट पदार्थ म्हणजे कुलकुल. शंखाच्या आकारातल्या या कुलकुलशिवाय पारंपरिक नाताळ मेजवानी तयारच होत नाही. कोकणातल्या नेवऱ्या अर्थात करंज्या यासुद्धा गोवन नाताळ पार्टीमध्ये भाव खाऊन जातात. मात्र सारण महाराष्ट्रातल्या पाककृतीपेक्षा वेगळे असते. नाताळ विशेष खवय्येगिरीमधला खासम खास पदार्थ म्हणजे नारळाचे दूध, गूळ आणि उकडा तांदूळ यापासून बनवले जाणारे डोडोल हे पुडिंग! त्याला मस्तपैकी काजू-बदाम लावून सजवले जाते.
नाताळ काळामध्ये खवय्यांसाठी ही खास गोवन खाद्य पर्वणी म्हणजे जिभेचे सर्वार्थाने पुरवलेले चोचले. जगभरातले पर्यटक गोव्यामध्ये येतात आणि या पारंपरिक खाद्य कृतींचा मनसोक्त आस्वाद घेतात. नाताळ हा मुळातच एक आनंदी, गूढ, वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा सण! त्या सुंदर वातावरणाला या अस्सल खवय्येगिरीची मिळालेली साथ माहोल बनवते आणि आनंदी शब्द उमटतात…
नाचोमया नाचोमया नातालाम म्हनून
सांताक्लॉज आयलो पोई गाडीचेर बसोन
नाचोमया नाचोमया आमी टाळ्यो वाजवोन
सांताक्लॉजाक मिळयोक तुमी येईत धावोन…
(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List