सोलापूरच्या इतिहासात प्रथमच होम मैदानाचा लिलाव, मुंबईचे व्यापारी चौधरी यांची ६ कोटी २१ लाखांची बोली
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त भरणाऱ्या गड्डा यात्रेतील प्रमुख परिसर असलेल्या होम मैदानावर स्टॉल उभारण्यासाठी पहिल्यांदाच लिलाव करण्यात आला आहे. तब्बल दीड महिन्यासाठी होम मैदान मुंबई येथील व्यापारी चौधरी यांनी 6 कोटी 21 लाख रुपयांना घेतले आहे. गतवर्षी याच चौधरी यांनी 40 लाख रुपये देण्यासाठी नाराजी व्यक्त केली होती.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची महायात्रा जानेवारी महिन्यात भरत असते. या यात्रेनिमित्त महापालिकेच्या ताब्यात असलेले होम मैदान मंदिर देवस्थानला 16 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत मोफत देण्यात येते. या मैदानावर मोठ्या प्रमाणावर गड्डा यात्रा भरविण्यात येते. यात्रेनिमित्त देशभरातून व्यापारी येतात. यापूर्वी सिद्धेश्वर देवस्थानकडून नाममात्र दरात व्यापाऱ्यांना स्टॉल उभारण्यात देण्यात येत होते. गतवर्षी काही व्यापाऱ्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीवरून धर्मादाय आयुक्तांनी होम मैदान हे जाहीर लिलावाने स्टॉल उभारण्यासाठी देण्याचे आदेश दिले होते.
यंदाच्या वर्षी देवस्थानने होम मैदानासाठी जाहीर लिलाव पुकारला होता. यात कर्नाटक, गुजरात व राज्यातील सहा व्यापाऱ्यांनी बंद पाकिटातून बोली लावली होती. मंगळवारी दुपारी ही बंद पाकिटे उघडण्यात आली. यात मुंबईतील नालासोपारा येथील व्यापारी चौधरी यांनी सर्वाधिक 6 कोटी 21 लाखांना मागणी केल्याने त्यांचा लिलाव मंजूर करण्यात आला. गतवर्षी चौधरी यांनी 40 लाख रुपयांना बोली लावून होम मैदान परवडत नसल्याची तक्रार केली होती. गड्डा यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच होम मैदानाचे जाहीर लिलाव करण्यात आल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List