अपघात वाढण्यामागे भरधाव वेग कारणीभूत
वाहतूक नियमांची ऐशी तैशी करत दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालविणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांचा धुमाकूळ अद्याप सुरूच आहे. ‘नियम पाळा, यम टाळा’ या पोलिसांच्या आवाहनाकडे सर्रास डोळेझाक केली जात असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
कल्याणीनगर येथील हीट अॅण्ड रननंतर पोलीस खडबडून जागे झाले. नाकाबंदी, अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास त्यांच्या पालकांवरच गुन्हा दाखल करण्याची धडक मोहीम पोलिसांनी राबविली होती. मात्र, अद्याप मद्यधुंद चालकांचा धुमाकूळ सर्वत्र सुरूच आहे.
सुट्टी एन्जॉय करून भरधाव वेगात परतताना कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात बारामतीमधील दोन शिकाऊ पायलट मृत्युमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली. नाकाबंदीत महिला पोलीस अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) यांना उडवून पसार झालेल्या आलिशान कारचालक अर्णव पवनकुमार सिंघल (वय २४, रा. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेला यश आले आहे. मित्रांसह कोरेगाव पार्कातील हॉटेलमध्ये पार्टी करून भरधाव वेगात परतत असताना अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
या दोन्ही घटना वेगामुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे किमान स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तरी वेगाशी स्पर्धा थांबविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. वाहन आणि वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करत वाहन भरधाव वेगात चालविण्याचे आकर्षण किशोरवयीन मुलांमध्ये वाढले. आहे. मात्र, वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणे जीवघेणे ठरत आहे. मुलांनी वाहन चालविल्यामुळे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या घटना टाळण्यासाठी पालकांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.
शहराबरोबरच ग्रामीण भागातही अल्पवयीन मुले वाहतूक नियमांची ऐशी तैशी करत वाहन चालवत आहेत. अगदी महामार्गावरही अल्पवयीन मुले कार चालवतात. वेगवेगळे स्टंट करत वाहन चालविणे ही रोजचीच बाब बनली आहे.
अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे गुन्हा आहे हे माहिती असूनही बहुतांशी पालक त्याकडे डोळेझाक करतात. एवढेच नव्हे, तर या मुलांना प्रोत्साहनही देतात.
अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यामुळे सतत अपघात घडतात. हे माहिती असूनही पालकांकडून मिळणारे प्रोत्साहन अन्य नागरिक, वाहनचालकांच्या जीवावर बेतते.
केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही हेच चित्र दिसते. शेतीसंबंधित बहुतांशी कामे अल्पवयीन मुलेच करतात. काही ठिकाणी तर ही मुलं ट्रॅक्टरही चालविताना सर्रास आढळतात.
वाहतूक नियमांची ऐशी तैशी करत ‘धूमस्टाईल’ने सुसाट वेगात वाहन चालविण्याची क्रेझच निर्माण झाली असून, त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत.
मुख्य रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने सुरू असतात. त्यामुळे गावांमधून मुख्य रस्त्यावर येताना या ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत धरण्याची वेळ येते.
वाहतूककोंडीबरोबरच या बेशिस्त वाहनचालकांमुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतुकीचे नियम जणू आपल्यासाठी नाहीतच, असे गृहीत धरणाऱ्या वाहनचालक विशेषतः दुचाकीस्वारांमुळे अनेक अपघात झाले आहेत. या कारवाईबरोबरच बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List