मतांचे आकडे आश्चर्यकारक! निकालावर शरद पवार यांचे प्रश्नचिन्ह, 232 आमदार असताना फोडाफोडी कशाला?
तुम्हाला 232 जागा मिळाल्या असताना फोडाफोडी का करता, असा सवाल करतानाच इतका मोठा विजय मिळूनही महायुतीमध्ये उत्साह दिसत नसल्याचा टोला आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीला लगावला. या पराभवामुळे खचून न जाता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, काँगेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
शरद पवार आज कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘निवडणुकीत यश मिळाल्यानंतर उत्साहाचे वातावरण असते; पण मला महाराष्ट्रात तसे वातावरण दिसत नाही,’ याकडे लक्ष वेधत शरद पवार म्हणाले, ‘आम्ही मतदानाची आकडेवारी गोळा केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला किती मते मिळाली आणि त्यांचे किती लोक निवडून आले, हे या आकडेवारीवरून दिसते.’ ‘मी आजतरी ईव्हीएमवर शंका घेत नाही; पण हे फक्त मतांचे आकडे असून, ते आश्चर्यकारक आहेत,’ असे पवार यांनी सांगितले.
छोट्या राज्यात विरोधक, मोठ्या राज्यात भाजप
‘गेल्या दोन महिन्यांत झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून सत्ताधारी म्हणू शकतात की, ईव्हीएमचा संबंध नाही; पण यातून दिसते की, मोठ्या राज्यांत भाजपचा विजय झाला, तर छोटी राज्ये विरोधकांकडे गेली आहेत,’ अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. यावेळी शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या मतांची आकडेवारी देत पवार यांनी टीका केली.
गणितच मांडले…
काँग्रेसला 80 लाख मते मिळूनही केवळ 16 आमदार निवडून आले. शिंदे गटाला 79 लाख मते मिळून 57 आमदार निवडून आले. म्हणजेच शिंदे गटाला काँग्रेसपेक्षा एक लाख कमी मते मिळूनही काँग्रेसपेक्षा 41 जास्त आमदार कसे निवडून आले. आमच्या राष्ट्रवादीची मते 72 लाख आहेत. पण फक्त 10 आमदार निवडून आले. मात्र, अजित पवार गटाला 58 लाख मते मिळाली आणि 41 आमदार निवडून आले.
एखाद्या गावाने बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यावर बंदी कशासाठी आणि कोणत्या कायद्याद्वारे? गावात 144 कलम लावण्याची गरजच काय? असा सवाल उपस्थित करून मारकडवाडी गावातील लोकांचे म्हणणे काय आहे हे ऐकून घेण्यासाठी मी उद्या रविवारी मारकडवाडीत जाणार असल्याचे पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List