पुण्यात तब्बल 10 हजार लाडक्या बहिणींना ठरवले अपात्र
राज्यात महायुतीचे नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर ‘लाडकी बहीण’ योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी पुन्हा सुरू करण्यात आली असून, त्यात आतापर्यंत पुणे जिह्यात 9,814 अर्ज अपात्र ठरले आहेत. 69,175 अर्जदारांची आधार संलग्नता पडताळणी केली जात आहे.
पुणे जिह्यामध्ये एकूण 20 लाख 84 हजार 364 महिलांना लाभ मिळाला आहे. योजनेसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत जिह्यातून 21 लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. आचारसंहिता जाहीर झाल्याने अर्जांची छाननी बाकी होती. ती संपताच जिल्हा प्रशासनाने प्रलंबित अर्जांची छाननी सुरू केली. आतापर्यंत 9,814 अर्ज त्रुटींमुळे अपात्र ठरले आहेत. शिवाय 5,724 अर्जांमध्ये किरकोळ त्रुटी आढळल्याने ते तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. प्रलंबित बारा हजार अर्जांची छाननी अद्याप बाकी आहे. याचाच अर्थ आतापर्यंत सुमारे 99.43 टक्के अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. छाननी झालेल्या एकूण अर्जापैकी 69,175 अर्जांचे बँकेच्या खात्याशी आधार सीडिंग बाकी आहे. 12,000 अर्जांची छाननी होणे बाकी असून, ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.
योजनेसाठी राबणाऱ्या अंगणवाडी सेविकांना पैसे दिले नाहीत
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अंगणवाडी सेविकांनी महिलांचे अर्ज भरून देण्याचे काम केले, मात्र अहिल्यानगरमधील सुमारे पाच हजार अंगणवाडी सेविकांना या कामाचा अजूनही मोबदला मिळालेला नाही. सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी फक्त काम करून घेतले, पण अजूनही त्या कामाचे पैसे दिले नाहीत, असा संताप महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केला आहे. अहिल्यानगरमधील 5 हजार 183 अंगणवाडी सेविकांना काम देण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक अर्जामागे 50 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List