ईव्हीएम विरोधातील लढाई सर्वोच्च न्यायालयात, महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार दाखल करणार याचिका
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमविरोधात महाविकास आघाडीने लढा उभारण्याचे ठरविले आहे. त्यानंतर आता आणखी एक पाऊल उचलून महाविकास आघाडीच्या पुण्यातील पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे जिह्यातील महाविकास आघाडीच्या 11 उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निर्णयाविरोधात ईव्हीएम मशीनची पडताळणी आणि मोजणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे. या मोजणीसाठी आवश्यक असणारे शुल्कदेखील भरले आहे. निवडणूक आयोगाकडून त्यांना 45 दिवसांमध्ये पडताळणीची तारीख निश्चित करून दिली जाणार आहे. मात्र, केवळ याच मुद्दय़ावर थांबून न राहता, महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी न्यायालयीन प्रक्रियादेखील सुरू केली आहे. यामध्ये प्रशांत जगताप, संजय जगताप, अशोक पवार, सचिन दोडके, अश्विनी कदम, राहुल कलाटे हे दिल्लीत दाखल झाले आहेत, तर रमेश बागवे, दत्ता बहिरट, रवींद्र धंगेकर आणि रमेश थोरात हे उद्या दिल्लीत पोहोचतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे जिह्यात महाविकास आघाडीला अवघ्या दोन जागा जिंकता आल्या. या निकालावर शंका घेत पराभूत उमेदवारांनी आव्हान दिले आहे.
शरद पवार सिंघवींशी करणार चर्चा
उद्या दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी चर्चा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतांची पडताळणी करताना व्हीव्हीपॅटमधील मते मोजली जावीत. मात्र, असे असताना निवडणूक यंत्रणेकडून निवडलेले मतदान यंत्र व शॉर्ट करून त्याचा ‘मॉक पोल’ घेण्यासंदर्भात सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रक्रियेविरोधात आणि ईव्हीएमविरोधातही सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेलेलो आहोत, असे हडपसर मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी सांगितले.
हमारा रिश्ता पुराना है
संसदेच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांवर प्रतिकात्मक उजेड टाकला. मोदी व अदानी यांचे मुखवटे दोन खासदारांनी धारण केले होते. या दोघांची राहुल गांधी यांनी मुलाखत घेतली. आप दोनों के रिश्ते कब से है या प्रश्नावर दोन्ही मुखवटाधारक खासदारांनी हमारा रिश्ता बहोत पुराना है और हम सब काम मिल जुलकर करते है, असे उत्तर दिले. राहुल गांधी यांनी ही उपहासात्मक पद्धतीने घेतलेली प्रतिकात्मक मुलाखत दिवसभर चांगलीच चर्चेत राहिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List