वकील दाम्पत्याचे हात-पाय बांधून विहिरीत फेकले; राहुरी दाम्पत्याच्या हत्येचा उलगडा; माफीच्या साक्षीदाराने सांगितला घटनाक्रम
राज्यात गाजलेल्या नगर जिल्ह्यातील राहुरीतील वकील दाम्पत्याच्या हत्याप्रकरणाची सुनावणी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी नगर येथील न्यायालयामध्ये झाली. सरकारी पक्षाच्या वतीने घटनेतील माफीचा साक्षीदाराची आज पुन्हा न्यायालयासमोर तपासणी झाली. यावेळी त्याने पुढील घटनाक्रम सांगितला. यावेळी मयत व्यक्तीचे एटीम कार्ड, सोन्याच्या बांगड्या व इतर वस्तूही त्याने ओळखल्या. ‘आम्ही या दोघांना पोत्त्यात घालून त्याला दगड बांधून विहिरीत फेकून त्यांची हत्या केल्याचे कबूल केले. तर केलेल्या या कृत्याचा मला पश्चात्ताप झाल्याची कबुलीही त्याने दिली.
नगरच्या मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर राहुरी न्यायालयात वकिली करणारे अॅड. राजाराम जयवंत आढाव (वय – 52) व अॅड. मनीषा आढाव (वय 42) या दाम्पत्याच्या खून प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माफीच्या साक्षीदाराची तपासणी घेतली. दरम्यान, माफीच्या साक्षीदाराची उलट तपासणी आज सुरू झाली.
या प्रकरणात सरकारी साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे हा आरोपी आणि माफीचा साक्षीदार आहे. आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग, भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम महाडिक, बबन सुनील मोरे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
सोमवारी सुनावणीदरम्यान, आरोपी हर्षल ढोकणे याला त्रास झाला होता. त्यानंतर आज पुन्हा सरतपासणी सुरू झाली. वकील निकम यांनी त्याला प्रश्न विचारत, घटना कशी घडली याचा उलगडा करा, अशी मागणी केली, यावेळी वकिलांना आम्ही त्यांच्या घरी नेल्यानंतर त्यांच्या मोचाईलवर फोन आला. त्यानंतर किरण दुशिंग याने वकिलांना नीट बोला, असा दम दिला. त्यानंतर आम्ही या दोघांना पहिल्या मजल्यावर नेले. तिथे किरण याने वकील राजाराम आढाव यांच्याकडे पैशाची मागणी केली. यावेळी वकील आढाव यांनी फिर्याद दाखवा, असे सांगितले. यानंतर किरण बाहेर गेला. आम्ही सर्वजण दोघांसोबत होतो. त्यावेळी मनीषा आढाव यांनी आम्हाला यांच्या तावडीतून सोडवा, मी तुम्हाला पैसे देईल, असे सांगितले. मात्र, हेच बोलणे किरण याने ऐकले. किरण याने आम्हाला शिवीगाळ करत धमकावले. त्यानंतर आम्ही दोघांना घेऊन वकिलांच्या पांढऱ्या गाडीतून ब्राह्मणीच्या बाजूला असलेल्या कॅनॉलच्या दिशेने गेलो. त्यावेळी मी घरी फोन करण्यासाठी माझा फोन सुरू केला. त्यावेळी मित्र शुभम गायकवाड याचा फोन आला. त्याला मी कारखान्यामध्ये काम करत होतो, असे सांगितले व फोन बंद केला. त्यानंतर आम्ही वांबोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानाच्या बाजूला दोघांना घेऊन गेलो. तेथे किरण याने पैशांची मागणी केली. त्यावेळी पैसे मॅडमच्या खात्यामध्ये 60 ते 65 हजार रुपये असतील, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी एटीएमवरून त्यांच्या वडिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यास सांगितले. ते एसबीआयचे एटीएम कार्ड होते. हे कार्डही आरोपीने ओळखले.
यानंतर दोघांना बांधून पुन्हा ब्राह्मणी येथे आणले. जर पैसे दिले नाहीत तर आम्ही बलात्कार करू, अशी धमकी दिली. त्यानंतर हातातील सोन्याचे ब्रेसलेट काढून घेतले. त्यानंतर किरण दुशिंग याने शुभम महाडिक, सागर खांडे व मला दोघांचे तोंड बांधण्यास सांगितले, त्यानंतर शुभमकडून किरण याने प्लॅस्टिकची पिशवी आणली. पती-पत्नीच्या डोक्यामध्ये पिशवी घालून चिकटपट्टी लावली. यावेळी दोघांना मारहाण करण्यात आली. दोघेही बेशुद्ध पडले होते.
यावेळी किरण याने वकिलांचा मोबाईल फोडला व झाडांमध्ये फेकला. यानंतर आम्ही दोन गोण्या आणल्या. त्यानंतर आम्ही कुकडवेवे रोडला बिरोबा मंदिराच्या पाठीमागील बाजूस थांबलो. तेथे आम्ही गोण्यांमध्ये दगल भरले, तेथे मॅडमचा मोबाईल फोडून नाल्यामध्ये टाकला. त्यानंतर बबन मोरे यांच्या घरातून साड्या घेतल्या. गावच्या स्मशानभूमीपाशी गेलो, तेथे विहिरीच्या जवळ साडी अंथरून त्यावर दगडाने भरलेल्या गोण्या आणून ठेवल्या. किरण याने वकिलांना साडीने पायापासून मानेपर्यंत बांधले, त्यानंतर आम्ही तिघांनी त्यांना बांधले. दगडाच्या गोण्या त्यांच्या शरीराला बांधल्या. काळ्या ओढणीने वकिलांचे पाय बांधले व पांढऱ्या रंगाच्या साडीने मॅडमला बांधले. त्यानंतर आम्ही चौघांनी मिळून त्यांना विहिरीमध्ये फेकून दिले. आधी वकिलांना फेकले, त्यानंतर मॅडमला फेकले, असे हर्षल याने सांगितले.
आरोपीची उलटतपासणी
नाशिकचे वकील सतीश वाणी यांनी घेतली. हर्षल याने न्यायालयासमोर वे मुद्दे सांगितले, त्यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी काही प्रश्नांची उत्तरे हर्षल याला देता आली नाहीत.
मला पश्चात्ताप झाल्याने दिला कबुलीजबाब!
हत्याकांडाचा पश्चात्ताप मला झाला, त्याच वेळेला मी माझ्या मित्रालाही सगळी बाब सांगितली व मला आता कबुलीजबाब द्यायचा आहे, असा निश्चय केला च त्यानंतर मी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर कबुलीजबाब दिला असल्याचे हर्षल याने न्यायालयाला सांगितले.
मिळालेले 10 हजार रुपयेही जाळले
वकील दाम्पत्याची हत्या केल्यानंतर आम्हाला चार ते पाच लाख रुपये मिळणार होते. मात्र, किरण याने प्रत्येकी फक्त 10 हजार रुपये दिले. मात्र, मला केलेल्या घटनेचा पश्चात्ताप झाला होता. त्यामुळे मी मिळालेले पैसे तत्काळ जाळून टाकले, असे हर्षल याने न्यायालयासमोर सांगितले.
आरोपीने ओळखल्या वस्तू
माफीचा साक्षीदार याला या घटनेमध्ये वापरलेला रुमाल, तसेच महिला वकील यांच्या हातामध्ये असलेले ब्रेसलेट माफीच्या साक्षीदार हर्षल याला दाखवण्यात आले व त्याने ते न्यायालयासमोर ओळखत असल्याचे सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List