भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून खून, यवत गावच्या हद्दीत आढळला मृतदेह
विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी (दि. 9) सकाळी त्यांचे पाच जणांच्या टोळक्याने मोटारीतून अपहरण केले होते. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आली होती. मात्र त्यांचा मृतदेह यवत गावातील एका मोकळ्या जागेत टाकल्याचे उघडकीस आले. सायंकाळी उशिरा पोलिसांना मृतदेह हाती लागल्यावर खळबळ उडाली. त्यांच्या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
सतीश वाघ (58, रा. फुरसुंगी, सासवड रस्ता) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोटारीतून आलेल्या चौघांनी सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळच्या सुमारास अपहरण केले होते. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हडपसर आणि गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेत होती.
वाघ हे सोमवारी सकाळी हडपसर येथील ब्ल्यू बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. त्यावेळी अचानक गाडी त्यांच्याजवळ आली. त्यातून उतरलेल्या दोघांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत घातले. आतमध्ये अगोदरच दोघे बसले होते. यानंतर त्यांना सोलापूरच्या दिशेने नेण्यात आले. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हडपसर पोलिसांची आणि गुन्हे शाखेची पथके तपास करीत होती.
दरम्यान, वाघ यांचा मृतदेह यवत गावाच्या हद्दीत सापडला. ग्रामीण पोलिसांनी याची माहिती पुणे पोलिसांना दिली. यानंतर हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रात्री उशिरा हडपसर पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस पथकांना मार्गदर्शन केले. तर अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे हे सकाळपासून हडपसर पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.
आर्थिक वाद की आणखी काही कारण; तपास सुरू
वाघ यांची मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता असून त्यांचा हॉटेलचाही व्यवसाय आहे. ज्या हॉटेलपासून त्यांचे अपहरण झाले ते त्यांनी भाड्याने चालवायला दिले होते. त्यांनी अनेक गाळेही भाड्याने दिले आहेत. सध्या ते शेती करत असून संपत्तीच्या वादातून अपहरण झाले की इतर काही कारणातून अपहरण झाले याचा पोलीस तपास करीत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या मामाचेच अपहरण होऊन खून झाल्यामुळे पोलिसांनी घटना गांभीर्याने घेतली आहे.
अपहरण करण्यात आलेल्या सतीश वाघ यांचा खून करून मृतदेह यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना केली आहेत, असे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List