संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात लढाई, राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्ला
देशात संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती आहेत. या शक्तींविरोधात आपली लढाई आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पुरुष असो किंवा महिला, तुम्ही कुठल्याही धर्माची असोत, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान संविधान करते, परंतु देशात धर्म, भाषा आणि राज्य म्हणून भेदभाव केला जात आहे, आम्ही त्यांना असे करू देणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी केला.
प्रियंका गांधी यांच्या प्रचारानिमित्त राहुल गांधी वायनाडमध्ये आयोजित जाहीर सभेत बोलत होते. देशातील एकमेव असा हा मतदारसंघ असेल ज्याला दोन खासदार मिळतील. तुम्हाला संसदेत समस्या मांडण्यासाठी दोन दरवाजे असतील, असेही राहुल म्हणाले.
मोदींचे उद्दिष्ट नोकऱ्या, शिक्षण देण्याचे नाही – प्रियंका गांधी
पंतप्रधानांचे उद्दिष्ट तुम्हाला चांगले जीवन, नवीन नोकऱ्या, आरोग्य किंवा शिक्षण देण्याचे नाही तर त्यांना कोणत्याही प्रकारचे सत्तेत राहायचे आहे, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. जेव्हा राहुल गांधी वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उभे होते तेव्हा त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न भाजप आणि मोदी यांनी केला, परंतु तुम्ही राहुल गांधी यांच्या मागे ठाम उभे राहिलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे, असेही त्या म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List