“मी कधीच घाबरून काम केलं नाही, कारण मी हिंदू..”; धर्मावरून खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकली एकता कपूर
टेलिव्हिजन इंडस्ट्रीपासून बॉलिवूड आणि ओटीटीवर राज्य करणारी प्रसिद्ध निर्माती एकता कपूरला वेगळ्या ओळखीची गरज नाही. एकता आज यशाच्या शिखरावर असून इथपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. एकताला तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिच्या मालिका आणि वेब सीरिज यांवरून बरेच वादसुद्धा झाले. सध्या एकता तिच्या आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरवरून पुन्हा एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. अशातच एकता कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एकताने ‘द साबरमती रिपोर्ट’च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात तिच्या चित्रपटासोबतच धर्मावरून तिची खिल्ली उडवणाऱ्यांवरही निशाणा साधला आहेत.
ट्रेलर लाँचदरम्यान एकता कपूरला विचारलं गेलं की तिला तिच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडे पाठवताना भीती वाटली होती का? त्यावर उत्तर देताना एकता म्हणाली, “मला अजिबात भिती वाटली नव्हती कारण मी माझ्या आयुष्यात कधीच घाबरून काम केलं नाही. मी एक हिंदू आहे. मात्र हिंदू असण्याचा अर्थ धर्मनिरपेक्ष असणं आहे. मी कधीच कोणत्या धर्माबाबत कमेंट करणार नाही. माझं सर्व धर्मांवर प्रेम आहे.”
या मुलाखतीत एकता पुढे म्हणाली, “आधी मी टिळा लावायचे, तेव्हा त्यावरून माझी खिल्ली उडवली जायची. मी हिंदू आहे आणि जर मी माझ्या हिंदू असण्याची निशाणी सोबत घेऊन चालत असेन तरी त्यात लोकांना समस्या होती. माझ्या हातातील बांगड्या, अंगठ्या या सर्वांचीही मस्करी केली. एक काळ असा होता जेव्हा आम्हाला पूजासुद्धा लपून छपून करावी लागत होती. लोकांच्या दबावाखाली येऊन आम्हीसुद्धा असं दाखवू लागलो होतो की आमचा या सर्व गोष्टींवर विश्वास नाही. पण काही लोकांची आस्था असते, म्हणून ते हे सर्व करतात. नंतर मला जाणवलं की लोकांमुळे मी इतकी त्रस्त का आहे? आता मला या ट्रोलिंगचीही सवय झाली आहे. त्यामुळे मी आता दुसरे काय विचार करतील, याचा विचार करणं बंद केलंय.”
एकता कपूरच्या ‘द साबरमीत रिपोर्ट’ या चित्रपटात विक्रांत मेस्सी, राखी खन्ना आणि रिद्धी डोग्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. निर्मात्यांनी असा दावा केला आहे की या चित्रपटात साबरमतीमध्ये झालेली ती घटना दाखवण्यात येणार आहे, ज्याविषयी आतापर्यंत कोणी खुलेपणाने बोलण्याची हिंमत केली नाही. हा चित्रपट येत्या 15 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List