आता हटाव मोहिमेला प्रारंभ; रोहित-विराट समय समाप्तीच्या उंबरठ्यावर, निवड समितीकडून धाडसी निर्णयाची अपेक्षा
हिंदुस्थानी संघाला आपली प्रतिष्ठा वाचवता आली नाही. त्यामुळे आता हिंदुस्थानी निवड समितीला हटाव मोहीम राबवायला पुढाकार घ्यायला हवा, असा आवाज क्रिकेटविश्वात घुमू लागलाय. आगामी ऑस्ट्रेलिया दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या मालिकेसाठी संघ निवडला असला तरी निवड समितीने कसोटी क्रिकेटला साजेसे खेळपट्टीवर नांगर टाकणाऱया फलंदाजांनाही राखीव म्हणून संघासोबत घ्यावे, अशी मागणी आता क्रिकेटप्रेमींकडून केली जातेय.
सलगच्या दारुण पराभवाने खचलेल्या पाकिस्तान संघातून बाबर आझम, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि सरफराज अहमद या चार दिग्गजांना डच्चू देण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. आता तशाच निर्णयाची बीसीसीआयच्या निवड समितीकडून अपेक्षा आहे.
हिंदुस्थानी संघाचे दीपस्तंभ असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून संपल्याचे चित्र समोर आले आहे. विराटसारखा फलंदाज आधी जिद्दीने खेळायचा. मोठी खेळी करण्यासाठी संघर्ष करायचा. पण आता त्याच्या खेळातील जिद्द आणि संघर्षच गायब झाल्यामुळे आता त्यालाही संघातून गायब करण्याची वेळ निवड समितीवर आल्याची बोंब नेटीझन्सने सुरू केली आहे.
आजवर क्रिकेटप्रेमींनी रोहित आणि विराटवर कधी फारशी टीका केली नव्हती, मात्र आता त्यांचे अपयश बोचू लागले आहे. विराट गेली पाच वर्षे सातत्याने धावांच्या दुष्काळाचा सामना करतोय, मात्र तो पूर्वपुण्याईवर संघात कायम आहे. गेल्या पाच कसोटीतही त्याच्या बॅटमधून अपेक्षित धावा आलेल्या नाहीत. 6, 17, 47, नाबाद 29, 0, 70, 1, 17, 4 आणि 1 अशा खेळ्या केल्या आहेत. गेल्या दहा डावांत त्याने 21.33 च्या सरासरीने फक्त 192 धावा केल्या आहेत.
दुसरीकडे रोहितचे अपयशही सर्वांच्या डोळय़ात खुपू लागलेय. त्याने तर 6,5, 23, 8, 2, 52, 0,8, 18, 11 अशा निराशाजनक खेळय़ा करून केवळ 133 धावा केल्यात. ही कामगिरी रोहितला संघात स्थान देऊ शकत नाही. कसोटी क्रिकेट हे पूर्णपणे वेगळे असताना इथे खेळपट्टीवर ठाण मांडून उभे राहणाऱया संयमी फलंदाजांची संघाला गरज आहे. ऑस्ट्रेलिया दौरा सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. ही मालिका रोहित-विराटसाठी शेवटची संधी ठरू शकते. जर ऑस्ट्रेलियात त्यांच्या बॅटमधून धावा निघाल्या तर आनंद होईल. पण ते अपयशी ठरले तर त्यांना सन्मानाने समय समाप्तीची घोषणा करावीच लागेल.
IND vs NZ Test – हिंदुस्थानी बॉम्ब फुसकाच; न्यूझीलंडनेच साजरी केली दिवाळी
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List