वेबसीरिज – मानवी सहसंबंधांचा प्रवास
>> तरंग वैद्य
‘मर्डर मिस्ट्री’ या श्रेणीत मोडणारी ‘36 डेज’ ही वेबसीरिज. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पकड घेते. एका वेगळ्या पद्धतीने कथानक उलगडत त्यातील थरारकता कायम ठेवणारी ही मालिका मानवी सहसंबंधांना एका सीमारेषेवर आणून ठेवते.
गोव्यामधील एक श्रीमंत भाग, शहरापासून लांब, प्रशस्त बंगल्यांची एक हाऊसिंग सोसायटी आहे ‘कासा दी मॅग्नोलिया.’ जिथे वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या विचारसरणीचे श्रीमंत लोक राहतात. त्यांचा उद्योग काय हे या ‘36 डेज’ नावाच्या वेब सीरिजमध्ये दाखवले नाहीये, पण ते काय काय उद्योग करतात हे व्यवस्थितपणे दाखवले आहे.
‘36 डेज’ नावाची वेब सीरिज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 12 जुलै 2024 पासून आली आहे. 35-40 मिनिटांचा एक भाग आणि एकूण आठ भाग अशी ही मालिका ‘मर्डर मिस्ट्री’ या श्रेणीत मोडणारी आहे. मालिकेची सुरुवातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका मुलीपासून सुरू होते आणि मग कथा एक वेगळ्या पद्धतीने उलगडत जाते. प्रत्येक भागात ‘36 डेज’ शीर्षक आल्यावर 30 दिवस आधी, 28 दिवस आधी, 20 दिवस आधी हे शीर्षक येतं आणि कथा पुढे सरकत जाते.
या बंगल्यांमध्ये राहणारी माणसे एकमेकांसोबत कशी वागतात, त्यांच्या आयुष्यात काय चालतंय हे या प्रवासादरम्यान दाखवलं गेलंय. श्रीमंती असली म्हणजे सज्जनता आली हा समज खोटा असतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इथे टोनी वालिया आहे, ज्याची सुंदर पत्नी आहे, पण तो स्त्राrलंपट आहे. ललिता आहे जिला आपली नसलेली श्रीमंती दाखवायचा शौक आहे. ललिताचा नवरा कसिनोमध्ये मॅनेजर असून त्याला बायकोचं वागणं पटत नाही, पण तो बोलू शकत नाही. गोव्याचा डॉन आहे. डॉ. त्र+षिकेश आणि त्याची बायको आहे जे समाजात आदर्श जोडपे म्हणून दाखवायचा प्रयत्न करतात, पण खासगीत त्यांचे अजिबात पटत नाही. बिनायफर आणि तिचा पेंटर नवरा हे वयस्क जोडपे आहे, ज्यांचा डिप्रेशनमध्ये गेलेला मुलगा आहे. हे सर्व वारंवार एकमेकांना भेटत असतात, पाटर्य़ा करत असतात. सगळे श्रीमंती थाटात चाललेलं असताना तिथे फराह झैदी नावाची हवाई सुंदरी भाडय़ाने राहायला येते आणि तिथले सर्व पुरुष आपापल्या पद्धतीने तिच्या मागे लागतात व त्यांच्या बायका त्यांच्यावर नजर ठेवू लागतात. मालिकेच्या सुरुवातीला या फराह झैदीचाच मृतदेह दाखवला असल्यामुळे ही कशी मेली किंवा हिला कोणी मारलं ही उत्सुकता कायम ठेवायचा प्रयत्न केला आहे.
मूळ कथासूत्र ‘35 डेज’ या इंग्रजी मालिकेवरून अधिकृतरीत्या घेतलेलं आहे. ‘36 डेज’सोबत एक ओळ येते ज्याचा मराठी अर्थ आहे ‘गुपिते आरोग्यासाठी हानिकारक आहेत.’ त्यामुळे तुमची काही गुपिते असल्यास लक्ष द्या.
मालिकेचं संपूर्ण चित्रीकरण गोव्यातील बंगल्यांच्या आत आणि आवारात झालं आहे. थोडीशी गोव्याची सुंदरताही चित्रित केली असती तर ते मालिकेच्या फायद्याचं ठरलं असतं. प्रेक्षकांची उत्कंठता वाढवण्यासाठी अधूनमधून काही असे शॉट्स आहेत, ज्यातून कोणी तरी बघतंय हे भासवण्याचा प्रयत्न केला आहे जो अशा मालिकांसाठी योग्यच आहे. गोवा म्हटलं की, ड्रग्सचा व्यापारही आलाच. तसेच हल्ली व्हिडीओ कॉलवरून मुली कसे लोकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळतात हेही दाखवलं आहे.
चंदन रॉय सान्याल या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. टोनीचे पात्र त्याने किंचित भडक रंगवलंय, कदाचित दिग्दर्शकाला असेच अपेक्षित होते. पूरब कोहली घरी एक आणि लोकांसमोर एक अशा दुहेरी रंगात चांगलं काम करून गेला आहे. अमृता खानविलकर बिनधास्त तरुणीच्या भूमिकेत भाव खाऊन गेली आहे. श्रुती सेठ, शारीब हाशमी, केनेथ देसाई आपापल्या भूमिकेत ठीक. शेरनाज पटेल यांनी प्रेमळ आई आणि नंतर वेडसर झालेली स्त्राrची भूमिका उत्तम निभावली आहे. नेहा शर्माला गोड दिसणं आणि मादक चालणं या शिवाय काही वाव नाही. फराह झैदीचे खरे नाव आणि तिच्या मृत्यूला कारणीभूत कोण, या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर काही तास देऊन ‘36 डेज’ ही मालिका बघा.
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List