मनोज जरांगे पाटील यांच्यावर लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? जनरल डायर हुडकून काढला पाहिजे!
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा खरेच गंभीर आहे. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवावीच लागेल. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे चूक आहे का? आंदोलनकर्ते जरांगे पाटील पाटील यांच्यावर लाठीचार्जचा आदेश कोणी दिला? जोपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदेश देत नाहीत, तोपर्यंत अशा घटना होत नसतात, मग यातील जनरल डायर कोण? हुडकून काढला पाहिजे. आंदोलनकर्त्यांवरच काय, वारकऱयांवरही यांनी लाठीचार्ज केलाय. लाठीचार्ज करणाऱयांना घरी बसवण्याची ही योग्य वेळ असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बदामराव पंडित यांच्या प्रचारार्थ गेवराईत आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जंगी सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रचंड जनसमुदाय सभेला उपस्थित होता. आदित्य ठाकरे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, तुम्ही जेवढय़ा उत्साहाने टाळ्या वाजवत आहात, तेवढय़ाच उत्साहाने मतदान करा आणि बदामराव आबांना विजयी करा. यावेळी बदामराव पंडित यांच्यासह जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, युधाजित पंडित, गोरख सिंघनसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपले सरकार आल्यास कर्जमाफी निश्चित
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास शेतकऱयांची कर्जमाफी करणार, शेतीमालाला भाव मिळवून देणार, मुलांचेही शिक्षण मोफत करणार, बेरोजगार तरुणांसाठी चार हजार रुपयांचा भत्ता देणार, महालक्ष्मी योजनेतून दर महिन्याला बहिणींसाठी तीन हजार रुपये देणार अशी आश्वासने आदित्य ठाकरे यांनी दिली.
कोविडमध्ये गुजरातची काय अवस्था होती?
कोविडच्या गंभीर आणि महामारीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख झाले. प्रत्येकाची त्यांनी काळजी घेतली. याच काळात गुजरातमध्ये काय अवस्था होती? ऑक्सिजनसाठी रस्त्यावर सैरभैर फिरत होते. मात्र महाराष्ट्रातील जनतेला ऑक्सिजन कमी पडू दिला नाही. हे काम उद्धव ठाकरे यांनी केले, असेही त्यांनी म्हटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List