शिक्षिकेचा बदला घेण्यासाठी विज्ञानवर्धिनी शाळेत जादूटोणा, पोलिसात गुन्हा दाखल
शाळेतील शिक्षिकेचा बदला घेण्यासाठी शहरातील एका शाळेत चक्क जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवाळी सुटीत शाळा बंद असतानाही शाळेच्या व्हरांड्यात हे जादूटोण्याचे अघोरी कृत्य करण्यात आल्याने संभ्रम वाढला आहे.
रोकडिया हनुमान कॉलनीत असलेल्या विज्ञान वर्धिनी शाळेत शुभांगी देविदास काथार या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या जादूटोण्यासंदर्भात त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या पाचवी ते दहावी वर्गाला शिकवितात. 31 ऑक्टोबर रोजी शाळेला दिवाळी सुट्या सुरु झाल्या.
दरम्यान, 4 नोव्हेंबर रोजी शाळेचे कार्यालय नियमितपणे सुरु झाले. 9 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे शाळेचे कार्यालयीन कामकाज झाल्यानंतर मुख्याध्यापकांसह कर्मचारी शाळा कुलूपबंद करुन घरी गेले. 11 नोव्हेंबर रोजी शाळेचे मुख्याध्यापक कामकाजासाठी सकाळी साडेदहा वाजता शाळेत आले. त्यांनी शाळेचे प्रवेशद्वार उघडले आणि समोर नजर पडताच त्यांना शॉक बसला.
शाळेच्या व्हरांड्यात एक मोठी बाहुली व चांदणीच्या आकाराची रांगोळी काढलेली होती. त्यात एक पणती ठेवलेली दिसली. तसेच हळदी कुंकू टाकलेल्या रांगोळीत गुणीलेचे चिन्ह काढून त्यावर ‘काथार तू गई’ असा मजकूर लिहिलेले दिसला. काळ्या बाहुलीवर लिंब, कवडी, मिरची एका काळ्या धाग्याला बांधलेले आणि कापलेल्या लिंबावर हळदी कुंकू टाकलेले दिसले.
हा जादूटोणाचा प्रकार असल्याचे लक्षात येताच भांबावलेल्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या शिक्षिका शुभांगी काथार यांना मोबाईलवरुन संपर्क करीत माहिती दिली. मुख्याध्यापकांनी सांगितलेला प्रकार ऐकून शिक्षिका शुभांगी काथार यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पतीसह शाळेत धाव घेतली आणि समक्ष शाळेच्या व्हरांड्यात करण्यात आलेला प्रकार पाहिला. हा अघोरी आणि जादूटोण्याचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर शुभांगी काथार यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठले.
शाळेच्या व्हरांड्यात निदर्शनास आलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. आपल्या जीवितास धोका व्हावा, या उद्देशाने हा अघोरी प्रकार करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक प्रवीण चौधरी हे स्वतः या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List