महागाईचा भडका! 6.21 टक्क्यांच्या 14 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहचली
लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत महागाईचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. महागाई वाढ रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. तसेच आता पुन्हा महागाईचा भडका उडाला आहे. महागाईचा दर आता 6.21 टक्क्यांवर पोहचला आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई 6.21% झाली आहे. 14 महिन्यांतील महागाईचा हा उच्चांक आहे. ऑगस्ट 2023 मध्ये महागाई दर 6.83% होता. तर एका महिन्यापूर्वी सप्टेंबरमध्ये भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे हा दर 5.49 टक्क्यांवर पोहोचला होता. त्यात आता आणखी भर पडली आहे.
महागड्या खाद्यपदार्थांमुळे ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई वाढल्याचे सांगण्यात येत आहे. वाढत्या महागाईत खाद्यपदार्थांचा वाटा सुमारे 50% आहे. किरकोळ महागाईच्या दरात महिन्याच्या आधारावर 9.24% वरून 10.87% पर्यंत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात महागाई 5.87% वरून 6.68% आणि शहरी भागात महागाई 5.05% वरून 5.62% वर पोहचली आहे.
महागाईची वाढ आणि घसरण उत्पादनाची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. जर लोकांकडे जास्त पैसे असतील तर ते अधिक वस्तू विकत घेतील. जास्त वस्तू घेतल्यास वस्तूंची मागणी वाढेल आणि मागणीनुसार पुरवठा झाला नाही तर या वस्तूंच्या किमती वाढतात. पैशाचा अतिप्रवाह किंवा बाजारात वस्तूंची कमतरता यामुळे महागाई वाढते. तर मागणी कमी आणि पुरवठा जास्त असेल तर महागाई कमी होते. कच्च्या तेल, वस्तूंच्या किमती, उत्पादित खर्चाव्यतिरिक्त, इतर अनेक गोष्टी आहेत ज्या किरकोळ महागाई दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सुमारे 300 वस्तू आहेत ज्यांच्या किमतीच्या आधारे किरकोळ महागाई दर ठरवला जातो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List