भुजबळ धोकेबाज; कुठल्याही मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत, येवल्यातील सभेत शरद पवारांचा हल्ला
विधानसभा, विधान परिषद, विरोधी पक्षनेते पद आणि मंत्री अशा सर्व संधी दिल्या. ईडीने त्यांना तुरुंगात पाठवले, तेव्हा पक्षाने त्यांना साथ दिली. तरीही फुटीर गटात जाऊन मंत्रीपद पटकावणाऱ्या छगन भुजबळ यांनी फसवेगिरीच्या कोणत्याच मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत. ऐतिहासिक, वेगळा नावलौकिक असलेल्या येवल्याचे नाव खराब करणाऱ्या धोकेबाजांना धडा शिकवा, असा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळ यांच्यावर चढवला.
राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. माणिकराव शिंदे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी येवल्यातील जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. भुजबळांनी सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धोका दिला. मुंबईचे महापौरपद देऊन त्यांनी प्रतिष्ठा दिली, तरीही भुजबळांनी शिवसेना सोडली. त्यानंतर ते भीतीखाली वावरायचे, आम्ही त्यांना त्यावेळी संरक्षण दिले. विधान परिषदेवर घेतलं, विरोधी पक्षनेता केलं, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदासह महत्त्वाची मंत्रीपदं दिली. येथे त्यांनी उद्योग केल्याने त्यांना पद सोडावं लागलं. ईडीने त्यांना अटक केली तेव्हा त्यांना कुणीही भेटायला जात नव्हते. अशावेळी माझी मुलगी खासदार सुप्रिया सुळे आणि आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना अडचणींच्या काळात आधार दिला असे शरद पवार म्हणाले.
पळून जाणाऱ्यांवर भरवसा ठेवू नका
लोकांनी ज्यांना मतं दिली, सत्ता दिली, अधिकार दिला, ते पळून जातात, फसवेगिरी करतात, त्यांच्यावर भरवसा ठेवू नका. हे कधी कुठे जातील, काय करतील याची खात्री नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिंधे, अजित पवार गटाचा समाचार घेतला. महाविकास आघाडीला ताकद देवून परिवर्तन घडवा, असे आवाहन केले. नाशिक जिह्यात त्यांनी पाच जाहीर सभांमध्ये मार्गदर्शन केले.
समजूत काढण्यासाठी गेले आणि मंत्रिपदाची शपथ घेतली
येवलेकरांनी माझ्या शब्दाची पिंमत ठेवत त्यांना पुन्हा विजयी केले. मविआ सरकारमध्ये त्यांना आम्ही मंत्री केले. यानंतर आमचा पक्ष फुटला, अजित पवार गट तयार झाला. ‘फार वाईट झालं, मी त्यांची समजूत काढून येतो’ असे सांगून गेलेल्या भुजबळांनी दुसऱ्या दिवशी मंत्रीपदाचीच शपथ घेतली. चुकीचं काम, फसवेगिरीच्या कोणत्याही मर्यादा त्यांनी शिल्लक ठेवल्या नाहीत. अशा धोकेबाज माणसाला थारा देऊ नका, असे शरद पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List