मोदी-शहा यांची बॅग इथून जाताना तपासा, महाराष्ट्र लुटून नेत आहेत; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बॅगांची तपासणी करण्याच्या प्रकारावरून आज निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. प्रचाराला येताना माझी बॅग तपासता तशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची इथून जाताना तपासा, ते महाराष्ट्र लुटून नेताहेत, अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी डागली.
औसा-दिनकर माने, उमरगा- प्रवीण स्वामी, धाराशीव-कैलास पाटील, बार्शी- दिलीप सोपल यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती सभा झाल्या. यावेळी त्यांनी मोदी-शहांबरोबरच भाजपा आणि मिंध्यांचा खरपूस समाचार घेतला. तसेच बॅगांच्या तपासणीवरून निवडणूक आयोगालाही खडे बोल सुनावले. ‘आज माझ्या बॅगेची पुन्हा तपासणी केली. निवडणूक आयुक्तांना सांगतो… तुमच्याकडे जास्तीची माणसे असतील तर माझ्या कपडय़ाच्या बॅगा सांभाळायला एक गाडी द्या माझ्याबरोबर. पाहिजे तर माझे कपडे पण तुम्हीच धुवा. काही हरकत नाही. माझ्याकडचे ओझे तरी कमी होईल. फक्त रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर माझे कपडे मला द्या नाहीतर तेसुद्धा ढापाल, असे उद्धव ठाकरे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
हा महाराष्ट्र मोदी–शहांना दिल्लीत बसून हाकता येणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशाचे काम सोडून भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी महाराष्ट्राच्या गल्लीबोळात फिरताहेत. हे पंतप्रधान आणि गृहमंत्री देशाचे आहेत की पक्षाचे पण महाराष्ट्र त्यांच्या थापांना आता भुलणार नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी निस्सीम त्याग करणारा महाराष्ट्र मोदी-शहांना दिल्लीत बसून हाकता येणार नाही, असा खणखणीत इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत
भाजप असेल वा मिंधे असेल, महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, असे मी म्हटले तर काय चुकीचे बोलतोय, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा व मिंधेंनी दिलेल्या खोटय़ा आश्वासनांचा पाढाच यावेळी वाचला.
फेक नरेटिव्ह सेट करताहेत
काल मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली असे ऐकले. त्यात सहकार सचिव व अन्य लोक होते. पूर्वीचे एक प्रसिद्धी प्रमुखही होते. यात शेतमालाची खरेदी झालेली आहे, शेतकऱ्याना भाव मिळालाय, आता सर्व आनंदी आहेत, असे भासवण्यासाठी फेक नरेटिव्ह सेट करायचे चाललेय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. याबाबत जाहिरात किंवा बातमी देण्याच्या तयारीत मिंधे आणि भाजप आहे, अशी दाट शक्यताही त्यांनी व्यक्त केली. बातमी चॅनेलवर दिसेल, पेपरमध्ये दिसेल पण शेतकऱ्याच्या घरात सोयाबीनचा ढीग पडलाय तो खरं बोलणार आहे, त्याच्या घरात पडलेला कापूस खरं बोलणार आहे आणि असे केले तर शेतकरी आणखी चिडून उठणार आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
मोदींसाठी सर्वांना नो एन्ट्री… हे शिवसेनेला मान्य नाही
मला सोलापूरला जायचेय. हेलिकॉप्टरने जायचेय. पण तिथे मोदींचे विमान उतरणार म्हणून नो एन्ट्री करण्यात आली. मोदी येणार म्हणून तुम्ही सर्व पक्षांना एअरपोर्ट बंद करता. ज्या रस्त्याने जाणार ते रस्ते नागरिकांसाठी बंद करता. मग हे टिकोजीराव येणार, भाईयो और बहनो… शिवसेना ही लोकशाही मानायला तयार नाही, असे उद्धव ठाकरे कडाडले.
‘बॅग तपासल्याबद्दल माझा आक्षेप नाही. पण काय हा दरिद्रीपणा. काल तपासली, आज तपासली. पुढेही प्रचाराला जाणार आहे तिकडे तुमची टीम तयार ठेवा असे मी सांगितले. माझी फोटोग्राफी जी बंद झाली ती पुन्हा करायला मिळतेय, माझ्यातला कलाकार जागा झालाय, यापेक्षा दुसरा आनंद काय! पण जो कायदा मला लावता तो मोदी-शहांना का नाही लावत? काय त्यांना एवढं सोनं लागलंय?
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List