रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 942 जणांचे टपाली मतदान
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात विविध मतदान केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या आणि बंदोबस्तावर असणारे पोलीस अशा 942 जणांनी आज टपाली मतदान करुन आपला हक्क बजावला. उद्याही टपाली मतदान या केंद्रावर होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.
शहरातील रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र.15, दामले विद्यालयातील मतदान केंद्रावर आज हे टपाली मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलीसांनी केले. एकूण 1567 पैकी आज पहिल्या दिवशी 942 जणांनी आपले मतदान केले. उद्याही याच ठिकाणी टपाली मतदान होणार आहे. यामध्ये दापोलीमधील 71, गुहागरमधील 66, चिपळूणमधील 88, राजापूरमधील 73 आणि इतर जिल्ह्यातील 171 अशा एकूण 942 जणांना समावेश आहे.
भव्य सेल्फी पॉईंट खास आकर्षण
दामले विद्यालयातील मतदान केंद्रावर भव्य असा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. याठिकाणी मतदान करुन आल्यानंतर मोठ्या संख्येने एकमेकांची सेल्फी काढण्यात मतदार गुंतले होते. या फलकावर ‘जागृत नागरिक होऊ या.. अभिमानाने मत देऊ या, जागृत मतदार..सशक्त लोकशाहीची ताकद अशी विविध जनजागृती करणारी घोषवाक्ये आकर्षित करत होती. निवडणूक निर्णय अधिकारी देसाई, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मतदारांसाठी मार्गदर्शन करत होते. या केंद्रावर पिण्याची पाण्याची सोय, आरोग्याची सोय त्याचबरोबर टपाली मतदानाचा मोठा सूचना फलक लक्ष वेधून घेत होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List