Train Accident – तेलंगणातील पेड्डापल्लीमध्ये रेल्वे अपघात, 11 डबे रुळावरुन घसरले
तेलंगणाच्या पेड्डापल्ली जिल्ह्यामध्ये एका मालगाडीचे अकरा डबे रुळावरुन घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गाझियाबादहून काझीपेठला लोखंडी कॉईल घेऊन जाणाऱ्या या मालगाडीचा पेड्डापल्ली जिल्ह्यातील राघवपूरम आणि कन्नाल दरम्यान अपघात झाला. या अपघातानंतर गाड्या तासनतास अडकून पडल्याने दिल्ली ते चेन्नई दरम्यानची वाहतूकीवर परिणाम झाला.
मालगाडीचे अकरा डबे रुळावरून घसरल्याने दिल्ली-चेन्नई मुख्य रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. केवळ सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्याच नव्हे तर एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्या आणि इतर मालगाड्याही रुळांवर अडकून पडल्या. या काळात प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आणि अनेक गाड्यांचा वेग खूपच कमी झाला किंवा त्या मध्येच थांबल्या आहेत. अपघातानंतर प्रशासनाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळावर पोहोचले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. या अपघाताचा अनेक ट्रेनना फटका पडला असून त्या तासभर उशीराने धावत आहेत.
या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. कारण मालगाड्यांच्या मोठ्या अपघातांमुळे प्रवासी आणि मालवाहतूक दोघांच्याही वेळेवर परिणाम होतो. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्यात असे अपघात टाळता यावेत आणि रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित करता यावी यासाठी रेल्वे प्रशासनाने या अपघाताचा तपास सुरू केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List