गुजरातमधील रुग्णालयाचा प्रताप, आयुष्यमान योजनेच्या लाभासाठी 19 जणांची अँजिओप्लास्टी; दोघांचा मृत्यू
गुजरातमधील अमहदाबाद जिल्ह्यात एक भयंकर प्रकार समोर आला आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पैसे लाटण्यासाठी रुग्णालयाने तब्बल 19 रुग्णांची अँजिओप्लास्टी केली. मात्र रुग्णालयाची ही पैशाची हाव दोन रुग्णांच्या जीवावर बेतली आहे. तर अन्य पाच रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. याप्रकरणी रुग्णालयाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
ख्याती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रशासनाने मेहसाणा जिल्ह्यातील बोरिसाना गावात 10 नोव्हेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. आरोग्य तपासणीनंतर 19 जणांना अँजिओग्राफी करावी लागेल, असे सांगण्यात आले. यानंतर सर्वांना उपचारासाठी अहमदाबाद येथील रुग्णालयात आणण्यात आले.
रुग्णालयात आणल्यानंतर सर्व रुग्णांची अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर सात रुग्णांची न सांगता अंजिओप्लास्टीही करण्यात आली. अँजिओप्लास्टी दरम्यान स्टेंट बसवल्यानंतर दोन रुग्णांचा तात्काळ मृत्यू झाला तर पाच जणांची प्रकृती गंभीर झाली.
आयुष्यमान भारत स्वास्थ भारत योजनेअंतर्गत गरजूंना प्रति वर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळतो. आयुष्मान भारत योजनेंतर्गत अवाजवी लाभ मिळविण्यासाठी रुग्णालयाने घाईघाईने शस्त्रक्रिया केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच रुग्णालयाने आपले मोबाईल फोन स्वतःकडे ठेवू घेतले. शिवाय सरकारी योजनेची नोंदणी आणि उपचार याबाबत आपल्याला कोणतीही माहिती दिली नसल्याचेही नातेवाईकांनी आपल्या आरोपात म्हटले आहे. या घटनेनंतरही रूग्णाच्या नातेवाईकांकडून रूग्णालय प्रशासनाने स्वतंत्रपणे 25 हजार रुपये वसूल केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List