गृहमंत्री म्हणतात, देशातून दहशतवाद मुळासकट नष्ट केला
देशातून दहशतवाद मुळासकट नष्ट केला असा दावा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. ते बोरिवली येथील सभेत बोलत होते.
तुम्ही कश्मीरला बिनधास्त जाऊ शकता, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे अमित शहा म्हणाले. मुंबईतील लोकांनीही बाहेर कुठे फिरायला जायचे असेल तर आता कश्मीरमध्ये फिरायला जा, असे अमित शहा म्हणाले. दरम्यान, नागपूरला जाताना विमानात बसायला भीती वाटत असेल तर आम्ही तयार केलेल्या समृद्धी महामार्गाने जा, लवकर पोहोचाल, असेही ते म्हणाले.
हल्ले सुरूच
जम्मू आणि कश्मीरच्या किश्तवाड जिह्यातील जंगलात दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना लष्कराच्या पॅरा 2 विशेष दलातील अधिकारी शहीद झाल्याची घटना 10 नोव्हेंबर रोजी घडली. यात तीन जवान गंभीर जखमी झाले. जम्मू-कश्मीरमध्ये कामगारांवरही सातत्याने हल्ले होत आहेत. काही दिवसांपूर्वी सहा कामगारांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. यात एक डॉक्टर आणि एका अभियंत्याचाही समावेश होता. दरम्यान, मणिपूरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाच्या छावण्यांवर हल्ले सुरू आहेत.
कुपवाडामध्ये चकमक सुरूच
जम्मू ः जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील नाम मार्ग भागात आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक सुरू झाली. या परिसरात दोन दहसतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली असून त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे. सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा दिला असून उत्तर कश्मीरमध्ये गेल्या सात दिवसांतील ही पाचवी चकमक आहे. याआधी बांदीपोरा, कुपवाडा आणि सोपोरमध्ये चकमकी झाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List