पुण्यात 138 कोटींचे सोने जप्त
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी सहकारनगर परिसरातील पद्मावती भागात केलेल्या नाकाबंदीत एका टेम्पोतून तब्बल 138 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. संबंधित टेम्पोचालक मुंबईतून दागिने घेऊन पुण्यात आला होता. मात्र, त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे आणि त्याने संशयास्पद उत्तरे दिल्यामुळे पोलिसांनी टेम्पोसह दागिने जप्त केले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर दागिने नेमके कोठे नेण्यात येत होते? या दृष्टीने तपास केला जात आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाला याची माहिती कळविली असून, आयकर विभागाकडे दागिने जमा केल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करून संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. सहकारनगर पोलिसांनी पद्मावती परिसरात नाकाबंदी केली होती. शुक्रवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास एका संशयास्पद टेम्पोचालकाला अडविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी वाहनात पाहणी केली असता, मोठय़ा प्रमाणावर सोन्याचे दागिने आढळून आले. पोलिसांनी तब्बल 138 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, टेम्पो जप्त केला आहे.
खेड–शिवापूरमध्येही पकडली होती 5 कोटींची रोकड
पुणे ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान खेड-शिवापूर परिसरात सोमवारी (21 रोजी) सायंकाळी सक्वासहाच्या सुमारास पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. गाडी क्र. एम-45, एझेड-2526मधून ही रक्कम सातारा-सांगलीच्या दिशेने नेण्यात येत होती. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदीत आलिशान मोटारीला अडविण्यात आले असता, त्यामध्ये मोठी रोकड असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी चालकासह चौघांची चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडील रक्कम बांधकाम ठेकेदाराची असल्याचे त्यांनी सांगितले. ही रक्कम आयकर विभागात जमा केली आहे. निवडणूक आयोग आणि आयकर विभागाच्या तपासानंतर कारवाई केली जाणार आहे.
सिक्वेल ग्लोबल कंपनीकडून दागिन्यांची वाहतूक
‘सिक्वेल ग्लोबल’ नावाची कंपनी असून, तिचे मुख्य कार्यालय तामीळनाडूतील कृष्णगिरी जिह्यात आहे. या कंपनीच्या देशभरात शाखा असून, हिरे, सोन्याच्या दागिन्यांचे वितरण करण्याचे काम कंपनीकडून केले जाते. सोने-चांदी आणि हिऱ्यांचा कच्चा माल व तयार दागदागिन्यांच्या वाहतुकीची जबाबदारी संबंधित कंपनी निभावते.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या नाकाबंदीत पोलिसांनी एका टेम्पोचालकाला अडविले होते. त्याच्या वाहनात 138 कोटी रुपयांचे दागिने आढळून आले. चालकाने समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे पोलिसांनी सोन्याचे दागिने, टेम्पो ताब्यात घेतला. याबाबत आयकर विभागाला माहिती देऊन सर्व ऐवज संबंधित विभागात जमा केले.
z स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-2
n टेम्पो क्रमांक एमएच-02, ईआर-8112 या वाहनातून चालकाने तब्बल 138 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने मुंबईतून पुण्यात आणले होते. ते दागिने एखाद्या व्यापाऱ्याचे असू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, चालकाकडे संबंधित दागिन्यांची विचारपूस करण्यात आली, त्यावेळी त्याने याबाबत पोलिसांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List