घरोघरी मशाल पेटवून गद्दारांचा कारभार जळून भस्म झाला पाहिजे, बुलढाण्यात उद्धव ठाकरे यांचे आवाहन

घरोघरी मशाल पेटवून गद्दारांचा कारभार जळून भस्म झाला पाहिजे, बुलढाण्यात उद्धव ठाकरे यांचे आवाहन

गद्दारांना 50 खोके म्हणजे सुटे पैसे झालेत अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच घरोघरी मशाल पेटवून गद्दारांचा कारभार जळून भस्म झाला पाहिजे असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

बुलढाण्यात प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जेवढी माणसं नव्हती, तेवढी आज विधानसभेसाठी जमली आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी वाटत होतं की मोदींना कोण घालवणार? संपूर्ण देशाने पाहिलं भाजपचा उधळलेला खेचर महाराष्ट्राने अडवून दाखवलं. गद्दारांनी शिवसेना फोडली तेव्हा दोघांना मी शब्द दिला होता. नरुभाऊ आणि जालिंदर. तुम्ही सगळ्यांनी जयश्रीताईला आमदार करायचं असा शब्द मागितला होता. बहुमत मिळाल्यावर जालिंदर यांना आमदार करण्याचे काम माझे. अशी माणसं हल्ली सापडत नाही. सगळी तयारी झाल्यावर जालिंदर यांना थांबायला सांगितलं. जालिंदर यांनी आदेश मानला आणि काम थांबवलं. आता तुमच्या साक्षीने जालिंदर यांची जबाबदारी घेतली आहे. कारण माझ्याकडे फसवा फसवी, थोतांड चालत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला एक गोष्ट शिकवली की सगळ्या गोष्टी जातात त्या परत येतात. सत्ता जशी गेली की परत येते. ट्रम्प हरले होते ते परत आले. शब्द दिला तर वाटेल ते होईल शब्द खाली पडता कामा नये.

ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे मित्र पक्ष आहेत. मी भाषणाची सुरूवात करताना म्हटलं की महाराष्ट्र प्रेमी बांधवानो आणि भगिनींनो. आपण सर्व महाराष्ट्रप्रेमी आहोत. पलीकडे महाराष्ट्रद्रोही आणि महाराष्ट्र लुटणारे आहेत. गेल्या वेळी आपण एक चूक केली. आता निवडणुकीत मी प्रचारासाठी फिरतोय. आपल्याविरोधात प्रत्येक ठिकाणी गद्दार उभा आहे. या गद्दारांना गेल्यावेळी मी उमेदवारी दिली होती आणि विश्वास टाकून तुम्ही त्यांना निवडून दिलं होतं, ही माझी चूक होती त्याबदद्दल मी माफी मागतोय. जी चूक झाली त्या चुकीची मी पुनरावृत्ती करणार नाही. ती चूक सुधारण्यासाठी मी जयश्रीताईंना उमेदवारी देतोय.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे उभे केले. आणि हा पवित्र भगवा मावळ्यांच्या हातात शोभतो दरोडेखोरांच्या हातात शोभत नाही. आपल्या पक्षाची चोरी नाही केली तर दरोडा घातला आहे. 40 जणांची टोळी आली आणि दरोडा टाकून गेली. आता म्हणतात पक्ष आमचा. आता 50 खोके म्हटल्यावर नॉट ओके. अडीच वर्षात त्यांनी इतकं कमावून ठेवलं आहे की त्यांना आपल्या अनेक पिढ्यांची सोय केली आहे. प्रश्न हा जनतेचा आहे. त्यांना आपण संधी दिली, संधीचं सोनं करण्याऐवजी त्यांनी माती केली. भरभराट त्यांची झाली. 50 खोके म्हणजे त्यांच्यासाठी सुटे पैसे झालेत.

एका गोष्टीचा मला आनंद आहे, पुरुषांपेक्षा इथे महिला जास्त आहेत. ही मातृशक्ती आहे, बुलढाणा म्हटलं की मातृशक्तीला वंदन केलंच पाहिजे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने घोषणा केली होती. छत्रपतींचे आशीर्वाद चलो मोदींके साथ, अशी काही तरी घोषणा होती. मतं मागायला तुम्हाला शिवाजी महाराज पाहिजे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदूर्ग किल्ल्यावर घाई घाईने मतं मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. जसं यांच प्रेम पोकळ, माणसं पोकळ तसा पोकळ उभा केला. पण तेवढ्यावरच नाही थांबलं. जाऊ तिथे खाऊ ही त्यांची वृत्ती. महायुतीचे महाभ्रष्ट सरकार आहे. शिवरायांचा पुतळा उभा करतानाही भ्रष्टाचार केला. आम्हाला आनंद झाला की, नावासाठी का होईना आमच्या पंतप्रधानांना तिथे यावं लागलं. महाराजांचा पुतळा उभारावा लागला. पण अशुभ हाताने केलेले काम हे कधीही यशस्वी होत नाही. तसंच मोदीजींच्या हाताने त्या पुतळ्याचे अनावरण केले. वर्षभराच्या आत तो पुतळा कोसळला. काय तर म्हणे वाऱ्याने तो पुतळा कोसळला. ज्या महाराजांनी सिंधुदुर्ग उभा केला, तो सिंधुदुर्ग 300 वर्षांनंतरही वाऱ्याला, वादळांना तोंड देत अजूनही उभा आहे. आणि आताच्या अद्ययावत काळात तुम्ही उभा केलेला पुतळा आठ महिन्यांत पडतो आणि आपण हे बघत बसायचं. हे सहन नाही होणार. ही महाराष्ट्राच्या हृदयात झालेली जखम आहे. त्यामुळेच महाराजांचं मंदिर हे मी प्रत्येक जिल्ह्यात बांधणार. महाराजांनी जी शिकवण दिली आहे, ती सर्व शिकवण त्या मंदिरात असणार आहे. राज्य कसं करायचं, महिलांचा सन्मान कसा करायचा, परस्त्री मातेसमान हे शिकवणारे माझे महाराज.

एक किलो कचरा 35 रुपये तर एक किलो सोयाबीन 30 रुपये, असा सगळा कारभार असेल तर या गद्दारांना तुम्ही काय भाव देणार? या गद्दारांना एक रुपयाही भाव मिळता कामा नये. या गद्दारांना एकही मत मिळता कामा नये एवढ्या निष्ठेने तुम्ही मतदान केलं पाहिजे. गेल्या लोकसभेला थोडा गोंधळ निर्माण झाला. कारण मशालीचा प्रचार करायला आपल्याला वेळ कमी पडला. अनेकांनी सांगितलं की आमची चूक झाली की आम्हाला तुम्हाला मत द्यायचं होतं पण तुमची जुनी निशाणी होती त्यामुळेच आम्ही गद्दारांना मत दिलं. पण आता तसं होणार नाही. आता मशालही प्रत्येकाच्या हृदयात धगधगतेय. या दरोडेखोरांकडे सगळं चोरीचंच आहे. मोदींचीही मला कमाल वाटते की तुम्ही चोर दरोडेखोरांना घेऊन चालून येत आहात. भाजपला कोणी ओळखत नव्हतं तेव्हा शिवसेनेने त्यांना साथ दिली. आम्ही साथ दिली नसती तर भाजपवाले कुठेही दिसले नसते ना मोदी पंतप्रधान झाले असते, ना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते. पण आमची तुम्ही मदत घेतली. हिंदुत्व म्हणून भ्रम निर्माण केला. आम्हीसुद्धा तुमच्या मागे आलो, पण वर गेल्यावर आम्हाला लाथा घालायला लागलात. नाही तुमच्या लाथा पकडून तुम्हाला भिरकावून लावलं तर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणार नाही.

यांना बाहेरून माणसं आणावी लागतात. विदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री फिरवले. मोठा नारा देऊन गेले. आणि असं काही बोलून गेले की जणू काही तुम्ही मेलातच. त्यांनी सांगितलं की एक रहेंगे तो सेफ रहेंगे. बटेंगे तो कटेंगे. कटेंगेची भाषा बोलणाऱ्यांनाच आम्ही भुईसपाट करणार आहोत. आम्हाल काय शिकवता. आम्ही सगळे एकत्र आहोत. हिंदू आहोत, मुस्लीम आहोत, ख्रिश्चन आहेत आणि माझा बारा बलुतेदार समाज आहे.

योगीजी आधी तुम्ही तुमच्या महायुतीमध्ये बघा. तुमचे गुलाबी जॅकेटवाले अजित पवार म्हणाले की बाहेरच्या लोकांनी इथे येऊन लुडबूड करू नये, बाहेरच्या लोकांनी आम्ही इथे कसं रहावं हे सांगू नये. महायुतीत जर एकवाक्यता नसेल तर योगीजी तुमच्याकडून एकवाक्यता काय समजून घ्यायची. जा आधी अजित पवारांना विचारा की तुम्ही काय बोललात आणि मी काय बोललो? आणि मग आम्हाला शिकवा.

नवाब मलिक यांच्यावर भाजपने आरोप केले आणि त्यांना तुरुंगात टाकले. त्या भाजपसोबत तुम्ही मांडीला मांडी लावून कसे बसता हा प्रश्न मला अजित पवारांना विचारायचे आहे. नवाब मलिक जर गुन्हेगार असतील तर त्यांना उमेदवारी देणाऱ्या, त्यांचा प्रचार करणाऱ्या अजित पवारांच्या मांडीला मांडीला लावून देवेंद्र फडणवीस कसे बसतात?

सगळ्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करत आहेत. माझ्या कुटुंबीयांना मदत करत आहेत. कारण या नालायकांना कुटुंबीयांचे प्रेम माहित नाही त्यांना जनतेबद्दल काय प्रेम असणार? जो आपल्या कटुंबाचा होऊ शकत नाही तो जनतेचा कसा होणार?

स्वावलंबी महाराष्ट्र आणि सर्वोत्तम महाराष्ट्र मी करून दाखवेन. आता जी महाराष्ट्राची अवस्था झालेली आहे, ती म्हणजे गुजरातच्या चरणी वाहून टाकलेला महाराष्ट्र करून दाखवला आहे. विदर्भाने सर्वाधिक आमदार, खासदार भाजपला दिले आहेत. एवढं देऊनही विदर्भातल्या किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या? मोदी म्हणाले होते की शेतकऱ्यांचे उत्पन्न मी दुप्पट करून दाखवेन. एका तरी शेतकऱ्याने हात वर करून सांगावं की माझे उत्पन्न दुप्पट झाले आहे, मी निवडणुकीतून माघार घेतो. किती जणांचे अच्छे दिन आले, किती जणांना पीकविमा मिळाला? उद्योग धंदे कुठे गेले?

ही सगळी वचनं मी देतोय कारण अडीच वर्षात मी काम करून दाखवलंय. महाविकास आघाडीने कर्जमाफी दिली होती. तुम्हाल मिळाली की नाही सांगा. सोयाबीनला दहा हजार रुपयांच्या वर भाव मिळत होता. पीकविमा मिळत होता, नुकसानभरपाई मिळत होती. कोरोना काळातही औषधं दिलं, ऑक्सिजन दिलं.

निवडणूक आल्यानंतर माझी लाडकी बहीण. 1500 रुपयांत बहीणीचे घर चालवायला निघालेत. दीड हजारांत मुलांना शिकवू शकता का? म्हणूनच आपण वचन दिले आहे की महाराष्ट्रातल्या मुलींना आणि मुलांना मोफत शिक्षण देणार. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणार. सरकारी कर्मचाऱ्यांना परवडणाऱ्या दरात घरं. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार. मला आयुष्यात कुणालाही दगा देणार नाही, जे मी करू शकतो तेच मी बोलतो आणि जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. हा शिवसेना प्रमुखांचा संस्कार आहे तो मला पुढे घेऊन जायचा आहे. शेवटी एकच विनंती आहे, ही निवडणूक तुमच्यावर सोपवतो आहे. घराघरात मशाल पेटली पाहिजे. आणि या मशालीमुळे गद्दारांचा कारभार जळून भस्म झाला पाहिजे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : ‘ते कदापि शक्य नाही’, खर्चाचा लेखाजोखा मांडत अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य Ladki Bahin Yojana : ‘ते कदापि शक्य नाही’, खर्चाचा लेखाजोखा मांडत अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवार...
अजितदादामध्ये बदल का झाला…अजित पवार यांनी सांगितले ते कारण
AJIT PAWAR EXCLUSIVE : महायुतीत सूर का जुळत नाही? अजित पवार म्हणाले….
भाजपचा नवाब मलिकांना नकार असताना तुम्ही तिकीट का दिलं? अजित पवारांची EXCLUSIVE प्रतिक्रिया
बॉलिवूडवर पुन्हा ‘अंडरवर्ल्ड’ दहशत? सलमान, शाहरुखनंतर आता ‘या’ अभिनेत्याला धमकी
अविवाहित असतानाही कोणाच्या नावाचे सिंदूर लावते ‘ही’ अभिनेत्री; नेटकऱ्यांनी घेतलं एजाज खानचे नाव
अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवातील अडथळे दूर करा