शेतकरी आत्महत्येचा खोटा दावा अंगलट, भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल
वक्फ बोर्ड जमिनीच्या वादातून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा खोटा दावा केल्याप्रकरणी कर्नाटकातील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्या यांच्यासह खोटी बातमी दिल्याप्रकरणी दोन कन्नड न्यूज पोर्टलच्या संपादकांवरही गुन्हा दाखल झाला आहे.
तेजस्वी सूर्या यांनी वक्फ बोर्डाने जमीन हस्तांतरीत केल्याने कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील रुद्रप्पा चन्नापा बालिकाई या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. तसेच त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान यांच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर संकट ओढवल्याचा आरोपही केला होता.
मात्र पोलीस तपासात कर्जबाजारीपणा आणि शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सूर्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वादानंतर सूर्या यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून आपली पोस्ट डिलिट केली.
सूर्या यांच्यासह कन्नड दुनिया ई-पेपर आणि कन्नड न्यूज ई-पेपरच्या संपादकांना देखील खोटी बातमी दिल्याबद्दल आरोपांचा सामना करावा लागला. हावेरी येथील शेतकरी वक्फ नोटिसला विरोध करत होते. त्यामुळे रुद्रप्पा यांना मानसिक त्रास होत असल्याचा आरोप बातमीतून करण्यात आला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List