Murji Patel शिंदेना भेटणार! अंधेरी पूर्वेत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीची शक्यता
राज्यात सध्या साऱ्यांचं लक्ष हे आगामी विधानसभा निवडणुकीकडे लागून राहिलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील मित्रपक्षांमध्ये ज्या जागांचा तिढा सुटला आहे तिथून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं आहे. काही उमेदवारांनी अर्जही दाखल केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अद्याप काही जागांसाठी चर्चा सुरु आहे. अशात आता 2022 साली विधानसभा पोटनिवडणुकीमुळे चर्चेत आलेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे मुरजी पटेल उर्फ काका हे शिंदेच्यां शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरजी पटेल हे आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मुरजी पटेल यांचा याच वेळेस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरजी पटेल हे आज रात्री वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळू शकते. महाविकास आघाडीकडून अंधेरी पूर्व ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून काही दिवसांपूर्वीच विद्यमान आमदार ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके या 2022 साली झालेल्या पोटनिवडणुकीत मशाल या चिन्हावर विजयी झाल्या होत्या. ऋतुजा लटके यांचे पती रमेश लटके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली होती.
ऋतुजा लटके यांना विजयाचा विश्वास
ऋतुजा लटके यांना पु्न्हा विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ऋतुजा लटके यांनी एबी फॉर्म स्वीकारल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळेस त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. “पहिली मशाल मीच पेटवली होती. दुसरी ही मशाल मीच पेटवणार. अनेक अडथळे समोर जाऊन पहिली मशाल पेटवली होती. आताची निवडणूक ही सोपी नाही, मेहनत करावी लागणार. कार्यकर्ते मेहनत देखील करतील”, असं ऋतुजा लटके म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List