वरळी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटानं खेळला मोठा डाव, मुख्यमंत्री शिंदे आदित्य ठाकरेंविरोधात उतरवणार आपला हुकमी एक्का?
राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. वरळी विधानसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2019 ला पहिल्यांदा आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवून आमदार झाले. मात्र यावेळी निवडणुकीचा पेपर म्हणावा तितका आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोपा नसणार आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मिलिंद देवरा हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मिलिंद देवरा यांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. ते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आला असून, या मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याची बातमी समोर येत आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही अधिक वेळा आदित्य ठाकरे यांनीच शिवसेना शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार हल्लाबोल केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीमधून निवडणूक लढवण्याचं आव्हान देखील केलं होतं. त्यामुळे आता देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरून एकनाथ शिंदे हे शिवसेना ठाकरे गटाविरोधात मोठा डाव खेळण्याच्या तयारीमध्ये आहेत.
आदित्य ठाकरे यांच्यासमोर मिलिंद देवरा किती मोठं आव्हान निर्माण करणार, वरळी मतदारसंघातून कोण बाजी मारणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मिलिंद देवरा यांच्याबाबत बोलायचं झाल्यास मिलिंद देवरा हे काँग्रेसचे मातब्बर नेते मुरली देवरा यांचे चिरंजीव आहेत. ते 2004 मध्ये राजकारणात आले. पहिल्यांदा काँग्रेसने त्यांना मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. 2004 आणि 2009 साली ते या मतदारसंघातून विजयी होतं संसदेत पोहोचले. ते काँग्रेसची सत्ता असताना राज्यमंत्री देखील होते. मात्र त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेकडून त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली.
मिलिंद देवरा यांनी 2009, 2014 आणि 2019 मध्ये मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.वरळी विधानसभा मतदारसंघाचा समावेश देखील याच लोकसभा मतदारसंघात होतो.2009 मध्ये देवरा यांना या मतदारसंघातून 39 हजार एवढं मतदान झालं होतं. तर 2014 ला 35 हजार आणि 2019 ला 41 हजार मतदान झालं.2009 ची टर्म सोडली तर 2014 आणि 2019 ला या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला देवरा यांच्यापेक्षा दुप्पट मतदान झालं. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळाल्यास दोन्ही उमेदवार तुल्यबळ वाटत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List