पाईपवर चढून चौथ्या मजल्यावर गेला, खिडकीतून बिझनेसमॅनच्या घरात शिरला… पुढे जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले
मालाड परिसरात एका व्यावसायिकाच्या घरातून ३६ लाख ४० हजार रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिन्यांची चोरी करण्यात आली. या सराईत चोराला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी झालेला संपूर्ण ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम भागात १० एप्रिल रोजी एका इमारतीत रात्रीच्या सुमारास ही घरफोडीची घटना घडली. यावेळी चोरट्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पाईपच्या साहाय्याने चढून खिडकीतून घरात प्रवेश केला. यानंतर घरात झोपलेल्या लोकांचा फायदा घेत त्याने कपाट तोडले. त्यानंतर त्यातील सोने व हिऱ्यांचे दागिने चोरुन पळ काढला. या घटनेची तक्रार मालाड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
आरोपीच्या शोधासाठी चार पथके
गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. हे फुटेज अस्पष्ट असल्याने पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्रणालीचा वापर केला. यानंतर फुटेजमधील व्यक्ती संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी चार पथके तयार केली. त्याच्या मित्रांची चौकशी करण्यात आली. यानतंर पोलिसांनी खास खबऱ्यांच्या मदतीने आणि सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आरोपीचा शोध घेतला.
सराईत गुन्हेगाराला अटक
अखेर, आरोपी जोगेश्वरी रेल्वे स्टेशनजवळ एका झोपडपट्टीजवळ पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याचा रेल्वे पटरीच्या बाजूने सुमारे दीड किलोमीटर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेला संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मालाड, खार, जुहू, कांदिवली, बोरिवली, चारकोप, सांताक्रूझ, आंबोली, वर्सोवा, गोरेगाव, ओशिवरा यांसारख्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ३० गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले ३६ लाख ४० हजार रुपयांचे सोने व हिऱ्यांचे दागिने जप्त केले आहेत. या कामगिरीसाठी मालाड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List