अदानीविरोधात धारावीकर एकवटणार, शिवराज मैदानावर 20 एप्रिलला जनसभा
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली वर्षानुवर्षे राहत असलेल्या धारावीकरांना अपात्र करून मुंबईबाहेर फेकण्याचा कट केंद्र, राज्यातील भाजप आणि अदानी समूहाची एनएमपीडीए कंपनी करत आहे. मात्र, धारावीकर कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत.
धारावीकरांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरूच राहणार असून रविवार, 20 एप्रिलला धारावीत विशाल जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. धारावी बचाव आंदोलन समितीने क्रॉस रोडवरील शिवराज मैदानात संध्याकाळी ही सभा आयोजित केली आहे.
धारावीकरांना विश्वासात न घेता, त्यांच्या मनाविरोधात अदानी समूहाचा पुनर्विकास प्रकल्प धारावीकरांवर लादण्यात आला आहे. या प्रकल्पाने मुंबईतील सुमारे 2 हजार एकरची जागा अदानी बळकावणार असून धारावीकरांबरोबरच मुंबईकरांनाही याचा फटका बसणार आहे. या सर्वांना विरोध करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन समितीच्या वतीने धारावीकरांमध्ये जनजागृती करण्यात येत असून विशाल जनसभा शिवराज मैदानावर होणार आहे. त्यानंतर मोठे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर, धारावी बचाव आंदोलनाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱयांची आज बैठक झाली. यावेळी आदित्य जाधव, विठ्ठल पवार, अॅडव्होकेट राजेंद्र कोरडे, उमेश कन्नाकुस, अब्दुल कलाम खान, जगन्नाथ भोसले, रहीम मोटारवाला, अबू खालीद, नसिरुद्दीन आदीसह राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी, शिवसेना, शेकाप अशा विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
हिंमत असेल तर अपात्रांची यादी जाहीर करा!
आतापर्यंत 80 टक्के झोपडय़ांचा सर्व्हे झाला असा गैरसमज अदानीची कंपनी धारावीकरांमध्ये पसरवत आहे. पण प्रत्यक्षात धारावीत दहा ते पंधरा टक्केसुद्धा सर्व्हे झालेला नाही. त्यात लोकांच्या या सर्व्हेला मोठा विरोध आहे. धारावीतील हजारो झोपडीधारकांना अदानीने अपात्र केले आहे. हिंमत असेल तर अदानी आणि सरकारने अपात्रांची यादी जाहीर करून दाखवावी. ही यादी जाहीर केली तर संपूर्ण धारावीत संतापाचा भडका उडेल, असा इशारा बाबुराव माने यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List