एल्फिन्स्टन ब्रिजसाठी आज आंदोलन
एमएमआरडीएच्या शिवडी-वरळी उन्नत मार्गातील प्रकल्पातील विविध समस्या व स्थानिकांच्या न्याय्य हक्क तसेच सुविधांसाठी सरकारचे व एमएमआरडीए प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता शिवसेनेच्या वतीने उद्या, मंगळवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शिवडी नाका येथे एक दिवसाचे साखळी उपोषण करण्यात येणार आहे. शिवसैनिकांसह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
शिवडी-वरळी उन्नत मार्गामुळे विस्थापित होणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचे काय झाले, प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाच्या दोन्ही बाजूस नागरिकांना व स्थानिकांना ये-जा करण्यासाठी काय व्यवस्था केली, पश्चिमेकडून पूर्वेकडे येणाऱया रेल्वे ब्रीजचे काम कधी होणार, ब्रीज पाडल्यामुळे बाधित होणाऱ्या व्यापारी आणि फेरीवाल्यांच्या रोजगाराचे काय, प्रभादेवीतून केईएम, टाटा, वाडिया रुग्णालयाकडे येणाऱ्या रुग्णाच्या वाहतूक मार्गाचे नियोजन करावे आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
- एमएमआरडीएने हाती घेतलेल्या शिवडी-वरळी उन्नत मार्गातील प्रकल्पातील विविध समस्या व स्थानिकांचे प्रश्न अजूनही सोडवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महायुती सरकारविरोधात स्थानिकांमध्ये मोठा असंतोष आहे. या असंतोषाला वाट करून देण्यासाठी शिवसेना शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
आधी पुनर्वसन करा, मगच एल्फिन्स्टन पूल तोडा
गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून आम्ही इथे राहतोय. या चाळीसोबत आमच्या पिढ्यान् पिढ्याच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. वरळी-शिवडी कनेक्टरला आमचा विरोध नाही, पण या पुलासाठी आमचे संसार रस्त्यावर आणू नका. आधी आमचे योग्य पुनर्वसन करा, मगच एल्फिन्स्टन पुलाचे तोडकाम करा, अशी मागणी येथील प्रकल्पबाधितांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List