मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातील असेल… बंद दाराआड काय घडलं? संजय राऊत यांनी केलं मोठं विधान
नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संघाची चर्चा बंद दाराआड असते. ती बाहेर येत नसते. तरीही काही संकेत असतात ते स्पष्ट आहेत. संघ ठरवेल पुढला नेता, तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले राऊत ?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाची एक भूमिका आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी यावी ही संघाची भूमिका मला स्पष्टपणे दिसतेय. ज्या अर्थी मोदींना 10-11 वर्षानंतर नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावं लागलं ही काही साधी गोष्ट नाही. इतक्या वर्षात गेले नाहीत. नड्डा यांनी संघाची गरज नाही अशी भाषा केली होती. जेव्हा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो तेव्हा ती पंतप्रधान मोदींचीच भूमिका असते. हे जेव्हा तुम्ही समजून घेता, तेव्हा मोदींना संघ कार्यालयात का जावं लागलं हे स्पष्ट आहे, असं राऊत म्हणाले.
तुम्ही जे एक धोरण स्वत:साठी तयार केलं आहे, आपल्या सहकाऱ्यांसाठी, भाजपसाठी धोरण केलं आहे, की 75 व्या वर्षी निवृत्त व्हावं लागेल आणि तुम्हाला केदारनाथच्या गुंफेत जावं लागेल. फकीर आदमी है, झोला लेकर आया था. झोला भरकर जाएगा. झोला बहूत भरा है उनका, असंही राऊत म्हणाले.
वडील जिवंत असेपर्यंत… काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
संजय राऊत यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया दिली. ‘मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही, मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरीच वर्ष ते काम करणार आहेत, आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे , 2029 चे पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहतो आहोत. पूर्ण देशही तेच बघत आहे, त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघल संस्कृती आहे, त्यामुळे आत्ता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, तसा प्रश्नही नाही. जोपर्यंत माझा विषय आहे, मााझा त्याच्याशी संबंध नाही’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List