उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लाखो अनुयायांची मानवंदना
शोषित, पीडित, दीनदुबळय़ा समाजाबरोबरच महिलांच्या आयुष्याचे सोने करणारे, हिंदुस्थानच्या संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आज मुंबईसह अवघ्या जगभरात मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. चैत्यभूमी, दीक्षाभूमी तसेच बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या राजगृह येथे हजारोंच्या संख्येने अनुयायांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
रविवारी रात्रीपासूनच भीमजयंतीचा जल्लोष सर्वत्र सुरू झाला होता. फटाक्यांची आतिषबाजी, आसमंत दणाणून सोडणारा ‘जय भीम’चा जयघोष, गोडधोड पदार्थांचे वाटप, डीजेवर भीमगीतांचा निनाद आणि त्यावर थिरकणारी तरुणाई… असे जयंतीचे जोशपूर्ण वातावरणात गेले दोन दिवस सर्वत्र होते.
सोमवारी सकाळपासूनच शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत हजारोंच्या संख्येने अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, रणरणत्या उन्हात, लांबच लांब शिस्तीने रांग लावून, त्रिसरण, पंचशिलाचे पठण करत महामानवास अभिवादन केले. केवळ मुंबईच नाही, तर राज्यभरातून, परदेशातून आलेले अनुयायी महामानवापुढे नतमस्तक झाले. चैत्यभूमीप्रमाणेच नागपूरची दीक्षाभूमी आणि माटुंग्याच्या हिंदू कॉलनीतील बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या राजगृह येथेदेखील जयंतीचा जल्लोष पाहायला मिळाला.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, खासदार वर्षा गायकवाड, चिराग पासवान, आशीष शेलार, आमदार महेश सावंत, ज्योती गायकवाड आदी नेते तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक व अन्य सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील अधिकारी, मान्यवरांनीदेखील चैत्यभूमीवर डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करून तमाम देशवासीयांना डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
पुस्तके, प्रतिमांची खरेदी
चैत्यभूमीवर महामानवास अभिवादन केल्यानंतर घराकडे परतताना अनुयायांची पावले तेथील पुस्तकांच्या दुकानांकडे वळताना दिसली. महापुरुषांची पुस्तके, प्रतिमा, मूर्ती, निळे झेंडे, महापुरुषांचे चित्र असलेले बिल्ले, बॅचेसची अनुयायांकडून मनसोक्त खरेदी करण्यात आली.
मिरवणुका, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांची रेलचेल
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम तसेच क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी बाबासाहेब यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. निळे फेटे, उपरणे परिधान करून, ‘जय भीम’चा नारा देत अनुयायी मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब विद्यार्थ्यांना वही, पेन तसेच अन्य शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
स्टेटस, डीपीवर फक्त बाबासाहेब
देशाच्या जडणघडणीत बाबासाहेबांचे योगदान अमूल्य आहे. संविधानातून बाबासाहेबांनी तमाम देशवासीयांसाठी भरीव कामगिरी करून ठेवली आहे. त्यामुळे बाबासाहेब हे सर्वच समाजांचे असल्याने आज त्यांची जयंती सर्व समाजातील नागरिकांनी शक्य होईल त्या पद्धतीने साजरी केली. तमाम देशवासीयांनी व्हॉट्सअॅप स्टेटस, डीपीवर बाबासाहेबांचे छायाचित्र ठेवले होते. तसेच इन्स्टा, फेसबुक, यूटय़ूबवर बाबासाहेबांचे महान कार्य सांगणारे व्हिडीओ, माहितीपर संदेश अपलोड करून अनोख्या पद्धतीने वंदन करण्यात आले.
अंध, दिव्यांग बांधवांकडूनही वंदन
वरळीच्या एनएसडी अंध उद्योग गृहातील अंध बांधवांनी चैत्यभूमीवर येऊन महामानवास अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाबासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. तसेच भीमगीते गाऊन आनंद व्यक्त केला. शिवाय दिव्यांग बांधवांनीदेखील आवर्जून चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. आंबेडकरांना वंदन केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List