ज्येष्ठांना डिच्चू देत भाजप आमदाराची काँग्रेसबरोबर युती; सोलापूर बाजार समिती निवडणूक, आमदार देशमुखांना विरोध वाढला
पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेली व श्रीमंत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी पक्षातील दोन ज्येष्ठ आमदार तथा माजी मंत्री सुभाष देशमुख व विजय देशमुख यांना डच्चू देत काँग्रेसबरोबर आघाडी करून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. राज्यातील काँग्रेस-भाजपा आघाडीचा पहिला प्रयोग सोलापुरात होत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काँग्रेस-भाजपा आघाडीचा फॉर्म्युला कितपत यशस्वी होईल हे आगामी काळात दिसून येईल.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार दिलीप माने, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके यांच्यापुढे हात पुढे केला आहे. काँग्रेस भाजपा महाआघाडीला नवखे आमदार देवेंद्र कोठे यांनी पाठिंबा देत सक्रिय भाग घेतल्याने चर्चा रंगत आहे.
राज्यातील ‘अ’ दर्जा प्राप्त झालेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील श्रीमंत कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली. बाजार समितीची निवडणूक सुरू होताच भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपाचे स्वतंत्र पॅनेल उभे करण्याची तयारी केली आहे. मुलगा रोहन देशमुख यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने ही निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या निवडणुकीसाठी तब्बल साडेतीनशेहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, माजी सभापती, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके यांनीही काँग्रेसचे पॅनेल तयार केले असून, भाजपाविरुद्ध व काँग्रेस महाआघाडी थेट लढत होणार असे चित्र असतानाच भाजपाला निवडणुकीपूर्वीच पराभवाची चाहुल लागली. यापूर्वीसुद्धा काँग्रेसच्या पाठिंब्यावरच भाजपाने सत्ता मिळवली होती. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व माजी सभापतीबरोबर गुफ्तगू करत भाजपा-काँग्रेस आघाडीची मुहूर्तमेढ रोवली.
मुख्यमंत्री फडणीस यांनी बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन भाजपाचे ज्येष्ठ आमदार तथा मंत्री सुभाष देशमुख, विजय देशमुख यांच्या राजकीय वाटचालीला कात्री लावत सूत्रे भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे दिली आहेत. दरम्यान, काँग्रेस-भाजपा आघाडीची घोषणा आमदार सचिन कल्याणशेट्टी व काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी संयुक्त पत्रकार परिषदत घेत केली आहे. या पत्रकार परिषदेसाठी भाजपाचे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, शहाजी पवार, अविनाश महागावकर, तर काँग्रेसकडून राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, श्रीशैल निरोळेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. १६ एप्रिल रोजी भाजपा-काँग्रेस आघाडीच्या पॅनेलची घोषणा होणार आहे.
भाजप कार्यकर्ते असतील तरच तयार आमदार सुभाष देशमुख
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अदेशानुसार कार्यकर्त्यांना घेऊन बाजार समितीच्या निवडणुकीत उतरलो आहे. मी भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी लढणार आहे. मला बाजार समितीच्या निवडणुकीत यावे म्हणून आवाहन केले आहे. तेथे जर सर्वच भाजपाचे कार्यकर्ते असतील तर मी यायला तयार आह, असे सांगत आमदार सुभाष देशमुख यांनी सचिन कल्याणशेट्टी यांच्या राजकीय डावपेचाला उघड विरोध केला आहे.
सुभाष देशमुख विरोधक एकवटले
आमदार तथा माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे एकेकाळचे भाजपातील कट्टर समर्थक शहाजी पवार, अविनाश महागावकर व नवखे आमदार देवेंद्र कोठे हे पहिल्यांदाच सुभाष देशमुख यांच्या निर्णयाला उघडपणे विरोध केला आहे. काँग्रेसबरोबरच्या बाजार समिती निवडणुकीत आघाडीच्या फॉम्र्म्युल्यासाठी व्यूहरचना केली असून जिल्ह्यात आता भाजपामध्येच सुभाष देशमुख यांना विरोध करणारा गट एकवटल्याने आगामी काळात संघर्ष अटळ आहे.
आमदार देशमुखांना विरोध वाढला
सुभाष देशमुख यांनी आघाडीबरोबर यावे – कल्याणशेट्टी
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडणूक बिनविरोध व्हावी व बाजार समितीच्या विकासाकरिता आमदार तथा माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेस-भाजपा आघाडीबरोबर यावे, असे आवाहन सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे. सुभाष देशमुख यांच्याबरोबर यापूर्वीही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List