नाशिकमध्ये उद्या शिवसेनेचे निर्धार शिबीर, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन; उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार
नाशिक येथे 16 एप्रिल रोजी शिवसेनेचे निर्धार शिबीर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ या शिबिरामध्ये धडाडणार आहे. उद्धव ठाकरे या निर्धार शिबिरामध्ये काय बोलतात याबद्दल तमाम शिवसैनिकांसह प्रसारमाध्यमे आणि राजकीय तज्ञांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून शिवसेनेचे अन्य नेते आणि पदाधिकारी चर्चासत्रांच्या माध्यमातून आपले विचार मांडणार आहेत. मुंबईबाहेरचे पहिलेच निर्धार शिबीर नाशिक येथे होत आहे. त्यामुळे नाशिकमधील शिवसैनिक आणि पदाधिकारी शिबिराची जोरदार तयारी करत आहेत.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या निर्धार शिबिराबाबत माहिती दिली. शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस जीवन कामत, केशव पोरजे, भारती ताजनपुरे, प्रथमेश गीते, मसूद जिलानी, राहुल दराडे, सुनील जाधव, राहुल ताजनपुरे, बाळासाहेब कोकणे, योगेश गाडेकर आदी उपस्थित होते.
हे तर सुडाचे राजकारण – संजय राऊत
ब्रिटिशांशी लढण्याकरिता पंडित नेहरू यांनी पदरचे पैसे टाकून सुरू केलेल्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ या वृत्तपत्राच्या संपत्तीवर मोदी सरकारने टाच आणली आहे, तर दुसऱया बाजूला माफिया दाऊद इब्राहिमला क्लीन चिट दिली, हे सुडाचेच राजकारण सुरू आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर केला.
पहिले सत्र
- सकाळी 9.30 – प्रसिद्ध शिवशाहीर स्वप्नील डुंबरे यांची शाहिरी.
- सकाळी 10.00 – शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी स्वागत आणि प्रस्तावना करतील.
- सकाळी 10.30 – ‘आम्ही इथेच’ चर्चासत्र. सहभाग – शिवसेना नेते अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे आणि खासदार राजाभाऊ वाजे.
- सकाळी 11.00 – ‘महाराष्ट्र कुठे चाललाय?’ याविषयी आदित्य ठाकरे आपले विचार मांडतील.
- दुपारी 12.00 – बूथ व्यवस्था व मतदार यादी विषयावर शिवसेना नेते विनायक राऊत यांचे मार्गदर्शन.
दुसरे सत्र
- दुपारी 1.45 – शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे यांचे प्रास्ताविक.
- दुपारी 2.00 – संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी विषयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे विचार.
- दुपारी 2.45 – ‘मी शिवसेनेसोबतच का?’ चर्चासत्र. सहभाग – एकलव्य संघटनेचे पदाधिकारी शिवाजी ढवळे, शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर, अद्वय हिरे, माजी महापौर वसंत गीते.
- दुपारी 3.15 – अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या हद्दीत घुसखोरी, कार्यकर्त्यांवरील खोटय़ा केसेस, फेक नरेटिव्ह व लोकशाही या विषयांवर कायदेतज्ञ असीम सरोदे यांचे मार्गदर्शन.
- सायंकाळी 4.15 – शाहिरी पोवाडा कार्यक्रम.
- सायंकाळी 4.45 – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे – एक धगधगता विचार (नाशिककरांशी संवाद) चित्रफितीचे सादरीकरण.
- सायंकाळी 5.00 – शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांचे मार्गदर्शन.
- सायंकाळी 5.30 – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन.
स्थळ – मनोहर गार्डन, गोविंदनगर
वेळ – सकाळी 9 वाजता
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List