पालिका जपणार विद्यार्थ्यांचे वाचनप्रेम; प्रत्येक वॉर्डमध्ये सुरू होणार सुट्टीतले वाचनालय
मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावून त्यांच्यातील वाचनप्रेम जपण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘चला वाचू या’ हे सुट्टीतले वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. 2 मे ते 12 जून या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 6 या वेळेत हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबर खासगी शाळेतील विद्यार्थीही यात सहभागी होऊ शकतात.
मुलांना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकापासून दूर ठेवण्यासाठी तसेच त्यांची वाचनाची आवड वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने ’चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड ऑफिस) मध्यवर्ती शालेय इमारतीमध्ये 2 मे ते 12 जून या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत प्रत्येकी एक असे एकूण 25 वाचनालये सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी या अभिनव उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी केले आहे.
- उन्हाळी सुट्टीत प्रत्येक विभागात प्रत्येकी एका मध्यवर्ती शाळेत वाचनालय सुरू करण्यात येत आहे. वाचनालयात भरपूर पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- वाचनालयात मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वर्गखोली तसेच मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचीही उपलब्धता करण्यात येणार आहे.
- वाचनालयाच्या संपूर्ण व्यवस्थेसाठी अशासकीय संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे.
- प्रत्येक वाचनालयाच्या बॅनरवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संपूर्ण महापालिका कार्यक्षेत्रात 25 विभांगामध्ये सुट्टीतील वाचनालयांची माहिती गुगल मॅपसह उपलब्ध होणार आहे.
- सुट्टीतील वाचनालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र, आधारकार्ड आणि पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List