पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, एलओसीवर पुन्हा गोळीबार; हिंदुस्थानी लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कठोर पवित्रा घेतला. त्यानंतर चरफड झालेल्या पाकिस्तानने सातत्याने एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. शनिवार आणि रविवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कराने जम्मू आणि कश्मीर एलओसीवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला हिंदुस्थानी लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, दहशतवाद्यांची शोधमोहीमही तीव्र करण्यात आली आहे. सतत तिसऱ्या रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून गोळीबारात कुणीही जखमी झालेले नसल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तुतमारी गली आणि रामपूर सेक्टर या भागात पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानी लष्कर अॅक्शनमध्ये असून सातत्याने विविध भागांत जंगल परिसरात दहशतवाद्यांची शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत कुलगाम जिह्यात तंगमर्ग परिसरात सुरक्षा दल, पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांकडून संयुक्त कारवाई करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्त्याला घरात घुसून मारले
संशयित दहशतवाद्यांनी एका 45 वर्षीय सामाजिक कार्यकर्त्याला घरात घुसून गोळ्या घालून ठार केल्याची घटना जम्मू आणि कश्मीरच्या कुपवाडा जिह्यात घडल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. गुलाम रसूल मगरे असे या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून ते पंदी खास येथे रहात होते. मगरे यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या हत्येची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List