अयोध्येतील राममंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कामात घोटाळा, 13 किमी मार्गासाठी 850 कोटींची धूळधाण…
ना खाऊंगा ना खाने दुँगा असे छप्पन इंचाची छाती दाखवत निक्षून सांगणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात घोटाळ्यांची मालिकाच सातत्याने समोर आली आहे. भाजपाने तुंबडय़ा भरताना भगवान श्री रामालाही सोडले नसल्याचे समोर आले आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराकडे जाणाऱया रस्त्यांवर तब्बल 850 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर 500 मीटरच्या रस्त्यासाठी तब्बल 41 कोटींचा खर्च करण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
शीबा अस्लम फेहमी यांच्या किंतु परंतु या यूटय़ूब चॅनेलला अयोध्येतील वरिष्ठ पत्रकार सुनील अमर यांनी दिलेल्या मुलाखतीतून अयोध्येतील रस्त्यांबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सुनील अमर यांनी या मुलाखतीत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ही मुलाखत सध्या प्रचंड व्हायरल झाली असून अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीत झालेल्या घोटाळ्याची माहिती उघड करा, अशी मागणी हिंदुस्थानवासीयांकडून होत आहे.
क्रुझ, हॅलिकॉप्टर सेवा बंद झाली
शरयू नदीत क्रुझ सुरू करण्यात आले. परंतु, उद्घाटनाच्या दिवशी क्रुझ एका खांबाला धडकली. त्यानंतर त्यांना प्रवाशीच मिळाले नाहीत. पाच मिनिटांच्या अयोध्या दर्शनासाठी अडीच ते चार हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते. खासगी मोटर बोट 100 रुपयात अयोध्या दर्शन होत होते. तर सरकारचा किमान रेट 300 ते 500 रुपये होता. मग भाविक सरकारची सेवा का वापरतील. तसेच हॅलिकॉप्टरचे झाले. क्रुझ, मोटर बोट सर्व्हीसही झाली नाही. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणण्यात आल्या. परंतु, त्याचा तोटाच झाला, असे सुनील अमर यांनी सांगितले.
रोजगाराच्या नवीन संधी नाहीत
अयोध्येत मोठय़ा संख्येने भाविक येत असल्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असतील असे शीबा अस्लम यांनी विचारले असता रोजगाराच्या संधी नसल्याचे सुनील अमर यांनी सांगितले. सुरुवातीला राम मंदिराचे सौंदर्यीकरण आणि रेल्वे स्टेशनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तेव्हा वाटले होते की मोठय़ा प्रमाणावर रोजगार मिळेल. परंतु, भाविकांची संख्या घटल्यामुळे त्याचा परिणाम चोहोबाजूंनी झाला आहे. छोटेमोठे उद्योग सुरू आहेत. बाकी सर्व बंद पडले आहे, असे वास्तव त्यांनी सांगितले.
– रस्त्याच्या सौंदर्यीकरणासाठी वेगळा खर्च करण्यात आला. डिव्हाईडर, मोठमोठी झाडे, पथदिवे, खांब, डिस्प्ले, स्क्रीन्स लावण्यात आले त्या खर्चाचा रस्त्याच्या खर्चात समावेश नाही.
असा झाला घोटाळा
रामपथ- 13 किमी- 850 कोटी
रामजन्मभूमी पथ अर्धा किमी – 41 कोटी
भक्तीपथ अर्ध्या किमीहून कमी – 68 कोटी
धरमपथ – 1 किमीहून कमी – 65 कोटी
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List