IPL 2025 मुंबईचा पॉवरफुल्ल पंच, लखनौचा 54 धावांनी पराभव; सलग पाचव्या विजयासह गाठले दुसरे स्थान
लखनौने आयपीएलच्या इतिहासात मुंबईला सातपैकी सहा लढतींत हरवले होते. मात्र आज मुंबईने वानखेडे स्टेडियमवर अखेर लखनौला पॉवरफुल्ल पंच मारत 54 धावांनी पराभव केला आणि त्यांचा विजयरथ रोखला. विल जॅक्सची अष्टपैलू कामगिरी, ट्रेंट बोल्टची अचूक गोलंदाजी, जसप्रीत बुमराचा अखेरचा खतरनाक स्पेल आणि त्याआधी रायन रिकल्टन व सूर्यपुमार यादव यांची आकर्षक अर्धशतके ही मुंबईच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. पाचपैकी चार सामन्यांत पराभवाची नामुष्की झेलत तळाला पोहोचलेल्या मुंबईने नॉनस्टॉप फाइव्हस्टार कामगिरी करत यंदाच्या आयपीएलमध्ये सलग पाच विजय मिळवण्याचा पराक्रम करत प्ले ऑफच्या दिशेने आपली पावले टाकली आहेत. सहाव्या विजयामुळे मुंबईने थेट दुसरे स्थान गाठले आहे.
बुमराच्या एकाच षटकात तीन विकेट
आयुष बदोनी व डेव्हिड मिलर वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने लखनौला मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईकडून जसप्रीत बुमराने 16व्या षटकात डेव्हिड मिलर, अब्दुल समद व आवेश खान हे तीन फलंदाज बाद करीत लखनौच्या आशा धुळीस मिळविल्या. त्याने 4 तर ट्रेंट बोल्टने 3 विकेट टिपले. याचबरोबर विल जॅक्सने 2 तर कॉर्बिन बॉशने एक फलंदाज बाद केला.
रायन, सूर्यकुमार यांची अर्धशतके
त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 7 बाद 215 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सलामीला आलेल्या रोहित शर्माचा आज काही इम्पॅक्ट पडला नाही. 5 चेंडूंत 2 चौकारांसह 12 धावा करणाऱया रोहितला मयंक यादवने 12 धावांवर प्रिन्सकरवी झेलबाद करून लखनौला चांगली सुरुवात करून दिली. दुसरा सलामीवीर रायन रिकल्टनने 32 चेंडूंत 6 सणसणीत चौकार व 4 टोलेजंग षटकारांसह 58 धावांची खेळी केली. दिग्वेश राठीने बदोनीकरवी झेलबाद करून हे वादळ शमविले. मात्र तोपर्यंत मुंबईने 10च्या सरासरीने 8.4 षटकांत 88 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. मग प्रिन्स यादवने विल जॅक्सचा (29) त्रिफळा उडवून मुंबईला 12व्या षटकात तिसरा धक्का दिला, पण तोपर्यंत या संघाने धावसंख्या शतकापार नेली होती. रायन बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. त्याने 28 चेंडूंत 4 षटकार व तितकेच चौकार ठोकत 54 धावा चोपून काढल्या. दरम्यान जॅक्स बाद झाल्यानंतर तिलक वर्मा (6) व कर्णधार हार्दिक पंडय़ा (5) हे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. रवी बिश्नोईने तिलकला, तर मयंक यादवने हार्दिकला बाद केले
विल जॅक्सचा डबल धमाका
मुंबईकडून मिळालेल्या 216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा डाव 161 धावांवरच गळपटला. त्यांच्याकडून मिचेल मार्श (34), इम्पॅक्ट प्लेयर निकोलस पुरन (27), आयुष बदोनी (35) व डेव्हिड मिलर (24) यांनीच काय तो मुंबईच्या गोलंदाजीचा काही प्रमाणात प्रतिकार केला. जसप्रीत बुमराने एडन मार्परमला (9) बाद करून लखनौला पहिला धक्का दिला. मग विल जॅक्सने निकोलस पूरन (27) व कर्णधार ऋषभ पंत (4) यांना सातव्या षटकात बाद करून दुहेरी धमाका केला.
नमन, कॉर्बिनची फटकेबाजी
तिलक वर्मा व हार्दिक पंडय़ा झटपट बाद झाल्यानंतर सूर्यकुमार व नमन धीर यांनी 14 चेंडूंत 23 धावांची भागीदारी केली. आवेश खानने 18व्या षटकात सूर्यकुमारला मार्शकरवी झेलबाद केले. मात्र त्यानंतर नमन धीर (नाबाद 25) व कॉर्बिन बॉश (20) दोनच्या सरासरीने फटकेबाजी करीत मुंबईला 215 धावसंख्येपर्यंत पोहोचविले. नमनने 11 चेंडूंत 2 षटकार व 2 चौकार माकले, तर कॉर्बिनने 10 चेंडूंत 2 चौकारांसह एक षटकार लगावला. आवेश खाननेच अखेरच्या षटकात कॉर्बिनला बाद केले. लखनौकडून मयंक यादव व आवेश खान यांनी 2-2 फलंदाज बाद केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List