‘फुले’ चित्रपटातील कोणतेही दृश्य कट न करता चित्रपट प्रदर्शित होऊ द्यावा, अन्यथा…; प्रकाश आंबेडकरांचा सेन्सॉर बोर्डाला इशारा
“फुले चित्रपटातील कोणतेही दृश्य कट न करता चित्रपट प्रदर्शित होऊ द्यावा अन्यथा सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयावर आंदोलन करू”, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सेन्सॉर बोर्डाला दिला आहे.
थोर समाजसेवक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. यातच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ती दृश्ये हटवण्यास आणि काही दृश्यांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. यावरूनच आता प्रकाश आंबेडकर यांनी सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडीने आज पुण्यातील फुले वाडा येथे सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात निषेध आंदोलन केलं. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “महात्मा फुले यांच्या कार्याबाबत असलेले काही दृश्य काढण्याचे आदेश दिले आहेत. शासनाला आम्ही सांगतो की, महात्मा फुले यांचे वाङ्मय प्रकाशित करण्यात आलं आहेत. या वाङ्मयाबाबत (सेन्सॉर बोर्डाकडून) दिल्लीमध्ये युक्तिवाद केला जातोय. महात्मा फुले यांचे वाङ्मय महाराष्ट्र सरकारने छापलं आहे, जे दिल्लीतील सरकारे सुद्धा स्वीकारलं आहे. असं असताना हे दृश्य काढण्याचा सेन्सॉर बोर्डाला कुठला अधिकार आहे.” ते म्हणाले, सेन्सॉर बोर्डाने लावलेली कात्री काढली नाही तर, सेन्सॉर बोर्डाच्या कार्यलयावर आंदोलन करू.
आंबेडकर म्हणाले, “मुख्यमंत्री यांना आवाहन आहे की, एका बाजूला अभिवादन करताय आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करत असाल तर विरोधाभास नको. चित्रपट जसा आहे तसा दाखवला पाहिजे नाही तर, सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयावर धाव घेतल्याशिवाय राहणार नाही.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List