कृषिमंत्री कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; कोकाटेंनी राजीनामा द्यावा अक्कलकोट शिवसेनेची मागणी
शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेना उपनेत्या छाया शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील महायुती शासन शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांचा अपमान करण्याचे धोरण सरकारमधील नेत्यांकडून राबवले जात आहे. शेतकरी, कष्टकरी यांच्याबद्दल यांच्या पोटात जे आहे तेच ओठावर आले आहे. अशा राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीचे पैसे लग्नात खर्च करतो, अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. कर्जमाफी देणार नसाल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडा. निवडणुकीआधी मतांची भीक मागताना यांनी शेतकरी कर्जमाफी करू, असा शब्द दिला होता. आता, मी बोललो नाही. शेतकऱ्यांना पैसे भरावेच लागतील, असे अर्थमंत्री अजित पवार म्हणतात. त्यामुळे शेतकऱ्यांना फसवणाऱ्या महायुतीला शेतकरी पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही, असे छाया शिंदे यांनी म्हटले आहे.
शिवसेना उपनेत्या छाया शिंदे यांची मागणी
शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या वाचाळवीर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अक्कलकोट तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. अक्कलकोट अल्पसंख्याक तालुकाप्रमुख आयाज जमादार, माजी तालुकाप्रमुख मनोज पवार, सोपान निकते, माजी शहरप्रमुख रवि डोके, स्वामीराव मोरे यांच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार विक्रांत पवार यांना निवेदन दिले आहे. यावेळी माजी उपप्रमुख श्रीशैल पाटील, गंगाधर धोत्रे, अजय राठोड, बापू गुजा, मुस्कान काझी, सचिन जकापुरे, मिनाज कुरणे आदी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List