परदेशी पाहुण्यांनाही बगाडाचे कौतुक; बावधनमध्ये अलोट गर्दीत रंगली यात्राः 500 बैलांनी ओढला रथ

परदेशी पाहुण्यांनाही बगाडाचे कौतुक; बावधनमध्ये अलोट गर्दीत रंगली यात्राः 500 बैलांनी ओढला रथ

बावधनची बगाड यात्रा आज ‘काशिनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात अलोट उत्साहात पार पडली. परदेशी पर्यटकांसह लाखो भाविक या यात्रेत सहभागी झाले होते.

बावधन येथील ग्रामदैवत काळभैरवनाथाची बगाड यात्रा दरवर्षी माघ वद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी साजरी होत असते. गावातील भैरवनाथ मंदिरात होळी पौर्णिमेस ज्याच्या बाजूने कौल मिळतो, अशा भक्तास बगाड्याचा मान मिळतो. यंदा हा बहुमान गावातीलच अजित ननावरे (वय 39) यांना मिळाला होता. त्यांच्याकडून कृष्णा तीरावरील सोनेश्वर
येथे भैरवनाथ व ग्रामदैवतांची सकाळी साडेनऊच्या दरम्यान पूजा झाल्यावर सकाळी अकराच्या सुमारास बगाडास बैल जुंपण्यात आले. बगाडाच्या मागे वाजतगाजत ग्रामदैवताच्या पालख्या असतात. एका वेळी किमान दहा ते बारा बैल बगाडाच्या रथास जुंपण्यात येतात. शिवारातील किमान पाचशे बैलांद्वारे बगाड ओढून गावात आणले जाते.

सकाळी बगाड निघाल्यानंतर दुपारी एकच्या दरम्यान बगाडाची चाके शेतात रुतली होती. शीडही थोडे कलले होते. त्यामुळे शीड खाली उतरविण्यात आले. दुपारी दोन वाजता शीड पुन्हा बगाडावर चढवून मिरवणूक सुरू झाली. दुपारी साडेपाचच्या दरम्यान बगाड शेतशिवारातून पक्क्या रस्त्यावर आलेनंतर ते वाई- सातारा रस्त्यावर आले आणि आठच्या दरम्यान बावधन गावात पोहोचले. बगाड मिरवणुकीनिमित्त गावकरी व भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. आज किमान तीन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी बगाडाचे दर्शन घेतले. रस्त्याला खाऊ गल्लीचे स्वरूप आले होते.

बगाड पाहायला ब्राझिलचे पर्यटक
राज्यभरातून, तसेच परदेशातून अनेक लोक बगाड यात्रा पाहण्यासाठी आले होते. त्यामध्ये ब्राझिलमधून आलेल्या काही पर्यटकांचा समावेश होता. यात्रेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम, वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, अमोल गवळी, उपनिरीक्षक विपीन चव्हाण, सुधीर वाळुंज यांच्यासह आठ पोलीस अधिकारी, दंगाविरोधी पथक असे शंभरावर पोलीस बळ तैनात करण्यात आले होते.

बगाडाची वैशिष्ट्यपूर्ण रचना
बगाड संपूर्ण गावच्या व लगतच्या गावच्या शेतातील लाकडात तयार करण्यात येते. त्याचे साहित्य म्हणजे लाकडी कणा, कुण्या, दोन दगडी घडीव चाके, दांड्या, बैल जुंपण्यासाठी जोटे किंवा जू, जुपण्या, मध्यभागी आडवे मोठे खाच असलेले चौकोनी लाकूड (वाघला), मध्यभागी उभा खांब (खांबला), बाहुली, शीड, पिळकावण्या, वाकापासून तयार केलेली चहाटे (जाड दोरखंड), पुढे बैल जुंपण्यास शिवळा इत्यादी. संपूर्ण बगाडाच्या रचनेत लोखंडाचा अजिबात वापर केलेला नसतो, हे वेगळे वैशिष्ट्य !

बगाडामुळे बैल पाळण्याची प्रथा
बावधन गावात बगाड येईपर्यंत शिवाराप्रमाणे बैलजोड्या बदलण्यात येतात. त्यामुळे गावातील सर्व समाजांना व भावकींना बगाड ओढण्याचा मान मिळतो. कोणताही भाडणतंटा राहात नाही. गावातील शेतकऱ्याच्या बगाड यात्रेसाठी बैल पाळण्याची प्रथा आजही आहे. सर्व बैल धष्टपुष्ट असतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तपास पूर्ण होऊनही आरोपी केले, पायल तडवी आत्महत्या प्रकरण; नायर रुग्णालयाच्या माजी विभागप्रमुखाची हायकोर्टात धाव तपास पूर्ण होऊनही आरोपी केले, पायल तडवी आत्महत्या प्रकरण; नायर रुग्णालयाच्या माजी विभागप्रमुखाची हायकोर्टात धाव
पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी करण्यात आलेल्या नायर रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. चिंग लिंग यी यांनी मुंबई...
जोरदार युक्तिवाद, उलटतपासणी अन् बुद्धिकौशल्याचे कसब! डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात पार पडली द्वितीय नॅशनल मूट कोर्ट स्पर्धा
ज्वेलर्सचे दुकान फोडणारे अटकेत
माथाडी कामगार विधेयक विधान परिषदेत संमत
इस्रायलचे गाझात रात्रभर हल्ले; 85 पॅलेस्टिनींचा मृत्यू
हिंदुस्थानी संशोधकाला अटक
11 कोटीचे कोकेन जप्त