Sikandar : ‘सिकंदर’ हिट की फ्लॉप? 3 दिवसांत अर्ध्या बजेटचीही वसूली नाही, चकीत करणार मंगळवारचं कलेक्शन
अभिनेता सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित ‘सिकंदर’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 30 मार्च रोजी देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. परंतु बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षित अशी कमाई करताना दिसत नाहीये. या चित्रपटाची पहिल्या दिवशी ठिकठाक सुरुवात झाली होती. दुसरा दिवस ईदचा असल्याने त्याचा कमाईसाठी चांगला फायदा झाला. परंतु त्यानंतर देशातील काही ठिकाणी प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळत असल्याने ‘सिकंदर’चे शोज रद्द करण्यात आले. रविवार आणि ईदची सुट्टी मिळूनही ‘सिकंदर’ने अद्याप बंपर कमाई केली नाही. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत, परंतु आतापर्यंत कमाईचा 100 कोटींचा टप्पा गाठण्यात तो यशस्वी ठरला नाही.
- ‘सिकंदर’ने पहिल्या दिवशी 26 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
- दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत 11.54 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. यादिवशी चित्रपटाने 29 कोटी रुपये कमावले.
- सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, तिसऱ्या दिवशी ‘सिकंदर’ने 19.5 कोटी रुपये कमावले आहेत.
- ‘सिकंदर’ची तीन दिवसांची कमाई 74.5 कोटी रुपये इतकी झाली आहे.
सलमानचा हा चित्रपट जवळपास 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनल्याचं समजतंय. परंतु आतापर्यंत बजेटचा आकडासुद्धा कमाईतून वसूल झाला नाही. सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता येत्या काही दिवसांतही फारशी कमाई होईल, अशी शक्यता कमीच आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘गजिनी’ फेम ए. आर. मुरुगादोसने केलं असून साजिद नाडियादवाला याचा निर्माता आहे. यामध्ये सलमानसोबतच रश्मिका मंदाना, सुनील शेट्टी, शरमन जोशी, काजल अग्रवाल, प्रतीक बब्बर आणि सत्यराज यांच्याही भूमिका आहेत.
‘एबीपी’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत अनेक ठिकाणी ‘सिकंदर’चे शोज रद्द करण्यात आले नाहीत. काही ठिकाणी याचे शोज वाढवले गेले आहेत. परंतु सूरज, इंदौर आणि इतर अनेक ठिकाणी ‘सिकंदर’च्या शोजची जागा दुसऱ्या चित्रपटांनी घेतली आहे. ‘बॉलिवूड हंगामा’शी बोलताना एक चित्रपट व्यापार विश्लेषक म्हणाला, “मुंबईज शोज रद्द झाल्याची माहिती अद्याप आम्हाला मिळाली नाही. काही शोजमध्ये मोजकेच प्रेक्षक उपस्थित होते, परंतु त्यामुळे शोज रद्द झाले नव्हते. परंतु सूरत, अहमदाबाद, भोपाळ आणि इंदौर याठिकाणी सिकंदरचे शोज रद्द झाले आहेत.” मिळालेल्या माहितीनुसार, सूरमध्ये सिकंदरच्या दोन नाइट शोजच्या जागी एका गुजराती चित्रपटाचे शोज लावण्यात आले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List