‘घिबली’चा सापळा… मॉर्फिंग करून ब्लॅकमेलचा धोका
>>गजानन चेणगे
सध्या सोशल मीडियावर ‘घिबली’ आर्ट ऑनिमेशन ट्रेंडची हवा आहे. एआय प्लॅटफॉर्म ‘चॅटजीपीटी’च्या माध्यमातून आपल्या फोटोवरून कार्टून किंवा चित्राच्या स्वरूपात प्रतिमा मिळते. फेसबुकवर सक्रिय असणारे अनेक युजर्स ‘घिबली’च्या मोहात पडत असून, या वेगळय़ा शैलीतील फोटो पोस्ट करून, ‘सांगा मी कशी दिसते किंवा कसा दिसतो?’ अशा लाडीक प्रश्नासह युजर्सच्या अनेक पोस्टस् फेसबुकवर ओसंडून वाहत आहेत. दरम्यान, ‘घिबली’च्या सापळय़ात अडकू नका. तुमच्या छायाचित्रांचा गैरवापर होऊ शकतो. मॉर्फिंग करून ब्लॅकमेल केले जाऊ शकते. हॉकर्सचा धोका आहे,’ असा सावधानतेचा इशारा ग्लोबल सायबर क्राइम हेल्पलाइन नॅशनल अवॉर्ड विनर आणि महाराष्ट्र राज्य सायबर अवेअरनेस फाऊंडेशनचे विभागप्रमुख डॉ. धनंजय देशपांडे यांनी दिला आहे.
‘एआय’बद्दल जनमानसात प्रचंड प्रमाणात कुतूहल असले तरी त्याच्या वाटा फार तर तंत्रस्नेही लोकांनाच माहीत झाल्या आहेत. ‘चॅटजीपीटी’च्या माध्यमातून या अलिबाबाच्या गुहेत शिरण्याचा एक झरोका काहींना सापडला आहे. त्याच वेळी आता ‘घिबली’च्या रूपाने एआयचे पुढचे दालन खुले झाले आहे. त्याद्वारे आपल्याकडील छायाचित्राचे रूपांतर व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यातून साकारलेल्या व्यंगचित्रामध्ये होत आहे. मात्र, ही किमया चित्रकाराची नसून, ‘घिबली’च्या रूपाने एआय तंत्रज्ञानाची आहे आणि पदार्पणातच या ‘घिबली’ने फेसबुकवर हंगामा केलेला पाहायला मिळत आहे. एकूणच, सध्या ‘घिबली’चीच हवा आहे. अनेकांना या घिबलीचा मोह पडत असून, एआय आपले व्यंगचित्र कसे रंगवते याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. त्यामुळे फेसबुकवर घिबलीने जन्माला घातलेल्या चित्रांचा पाऊस पडलेला दिसत आहे. यामध्ये व्यक्तिगत छायाचित्र व समूह छायाचित्रांचाही समावेश आहे.
कशाला फोटोचे एआय हवे? सापळय़ात अडपू नका!
‘घिबली’कृत प्रतिमांचा फेसबुकवर महापूर आला असताना सायबरतज्ञ डॉ. धनंजय देशपांडे यांनी फेसबुकवर या अनुषंगाने जनतेला ‘अलर्ट’ करणारी एक पोस्ट केली आहे. ‘सध्या ट्रेंडिंगवर असलेले हे अॅप तुम्हाला भुरळ घालत आहे. तुम्ही तुमचा फोटो त्यात टाकला की, त्याचे स्केचमध्ये रूपांतर करून तुम्हाला पाठवते. त्यामुळे तुम्ही आनंदित होता आणि ते चित्र तुम्ही समाजमाध्यमावर टाकता. परंतु यात किती मोठा धोका तुम्ही घेता कल्पना आहे का? हे अॅप वापरण्यासाठी तुम्ही त्यांना फोटो गॅलरी, डेटा, गुगल लोकेशन आदी सगळं सगळं घ्यायची परवानगी डोळे झाकून देता. मधल्यामध्ये तो डेटा लीक होऊन हॅकर्सकडे गेला तर तुम्ही संकटात येऊ शकता. कार्टून बनवून लोकांना दाखवून पाच-दहा लाइक्स घेताना नकळत हॅकर्ससाठी तुम्हीच स्वतः ‘कार्टून’ बनू शकता,’ असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जगात मोफत काहीही मिळत नसते. काहीतरी मिळते तेव्हा काहीतरी काढून घेतले जाते याची जाणीव त्यांनी करून दिली आहे.
सध्या ‘घिबली’वरून आपल्या छायाचित्राचे चित्रात रूपांतर करून घेण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. तथापि, नागरिकांनी यासाठी फोटो देताना आवश्यक ती काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे यामध्ये आपण कशाकशाला परवानग्या देत आहोत याबद्दल सजग राहावे. – समीर शेख, जिल्हा पोलीसप्रमुख, सातारा
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List