सीबीएसईप्रमाणे भौतिक सुविधा, मनुष्यबळही पुरविणार का? ज. मो. अभ्यंकर यांचा प्रश्न
राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू करण्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी असून त्याबाबत खुलासा करण्याची मागणी शिवसेनेचे शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी केली आहे. सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू करताना भौतिक सुविधा आणि मनुष्यबळही पुरविणार का, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या भुसे यांच्या घोषणेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांबाबत खुलासा करण्याची मागणी अभ्यंकर यांनी भुसे यांना पत्र लिहून केली आहे. सीबीएसईप्रमाणे किमान 10 चौरस फुट जागा पुरिवणाऱ्या वर्गखोल्या, खेळाचे मैदान, विज्ञान प्रयोगशाळा, भूगोल, गणित, चित्रकला, संगीत, नाविन्यपूर्ण उपक्रम कक्ष इत्यादी शाळांना उपलब्ध करून देणार का, अशी विचारणा अभ्यंकर यांनी केली आहे. सीबीएसईच्या प्राथमिक शाळेत प्रत्येक वर्गाला दोन शिक्षक व इतर वर्गाच्या प्रत्येक तुकडीमागे दोन शिक्षक इतकी शिक्षकांची पदे आवश्यक आहेत. तितकी पदे राज्य सरकार शाळांना देणार का, दहावी-बारावीच्या परीक्षा सीबीएसईमार्फत घेणार का, असा सवालही करण्यात आला.
z सीबीएसईची मूल्यमापन पद्धती स्वीकारणार का, तसे केल्यास राज्य मंडळ आणि विभागीय मंडळ बरखास्त करणार का, शिक्षकांचे सीबीएसईच्या अभ्यासक्रमांना अनुसरून प्रशिक्षण घेणार का, असे प्रश्न करत शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेतील हवाच अभ्यंकर यांनी काढून घेतली आहे. या सुविधा उपलब्ध करून देणे सरकारला शक्य नसेल तर सीबीएसईच्या अभ्यासक्रमाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे या बाबींवर सरकारी आदेश काढून सविस्तर स्पष्टीकरण करावे, अशी मागणी अभ्यंकर यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List