Jalna News – जालना जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वार्यासह पावसाची शक्यता, दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात 1 ते 2 एप्रिल या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 50-60 कि.मी.प्र.ता. वेगाने) व गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 3 एप्रिल रोजी यलो अलर्ट जारी केला असून तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता.वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर 4 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती दक्षता बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे. मेघगर्जनेच्या वेळी, विज चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असतांना झाडांखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीज चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणार्या, लोंबणार्या तारांपासून दूर रहावे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकर्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर या मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्ष (02482-223132) वर तसेच नजीकच्या तहसील कार्यालयात, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List