महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्याने फुलवली आमराई, एक आंबा दहा हजाराला!
>> विजय जोशी
आंबा, फळांचा राजा। कोकणातील हापूस आंबा हा जगभरात प्रसिद्धः त्यापाठोपाठ आता केशरनेही चांगला जम बसवला आहे. साधारण हजार रुपयांना डझनभर हापूस मिळतो… पण दहा हजार रुपयांना एक आंबा असे कुणी सांगितले तर आपण नक्कीच त्याला वेड्यात काढू, पण ही किमया भोकर तालुक्यातील भोसी येथील नंदकिशोर गायकवाड या शेतकऱ्याने करून दाखवली आहे. गायकवाड यांच्या मळ्यात जगातील सर्वात महाग आंबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मियाझाकी’ वाणाची आमराई फुलली आहे.
नंदकिशोर गायकवाड परियक्षेच्या निमित्ताने 2021 मध्ये पुण्याला होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानाच ते शेतीमध्ये होत असलेल्या नवनवीन प्रयोगाची माहितीही घेत होते. यात त्यांना ‘मियाझाकी’ या आंब्याच्या वाणाची माहिती मिळाली. जपानमधील मियाझाकी शहरात भरलेल्या एका कृषी प्रदर्शनात या आंब्याबद्दल विस्तृत माहिती मिळाली. गायकवाड यांनी ‘मियाझाकी’ची लागवड करण्याचा निर्णय घेतला. या आंब्याच्या कलमाची किंमत साडेसहा हजार रूपये आहे. कमी पाण्यात येणारा हा आंबा आहे.
‘मियाझाकी’ ची आमराई करण्याचा निर्णय घेतल्यावर नंदकिशोर गायकवाड यांनी अगोदर आपल्या शेतातील मातीचा पोत तपासून घेतला. सुरुवातीला जपानमधून दहा रोपे मागवली. पत्नी सुमनच्या मदतीने त्यांनी अत्यंत मेहनतीने या रोपांची जतन केले, ‘मियाझाकी’च्या आजूबाजूल इतर फळांची झाडे लावली. गायकवाड यांच्या मेहनतीला यश आले. दोन वर्षांनतर ‘मियाझाकी’ला फळधारणा झाली. या वाणाच्या एका आंब्याची किंमत दहा हजार रुपये आहे.
‘मैंगो कॉम’ बर ग्राहक
‘मियाझाकी’ आमराई बहरली. पण हा एवढा महाग आंबा घेणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला. त्याचे उत्तरही नंदकिशोर गायकवाड यांना इंटरनेटने दिले. ‘मैंगो कॉम’ या वेबसाईटवर त्यांनी आंब्याचे फोटो टाकले, देशी वाणापेक्षा हा आंबा थोडा मोठा असतो. जगातील बाजारपेठेत तो ‘एग ऑफ सनशाईन’ महणून ओळखला जातो. सुरुवातीला आंब्याचा रंग जांभळा आणि पिकल्यानंतर तो लालसर होतो. आंब्याची चव अतिशय गोड आणि मधूर आहे. सध्या आंब्याची विक्री ते ऑनलाईनच करतात. सौदी अरबमधील एक ग्राहक एप्रिलमध्ये ‘मियाझाकी’ आमराईला भेट देऊन आंबे खरेदी करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
नंदकिशोर गायकवाड यांच्या आमराईत ‘मियाझाकी” बरोबरच नॅमडॉक माईल, बनाना, कोलंबो, केशर आणि दशहरी आंब्याचीही झाडे आहेत. आंब्याच्या विक्रीतून दरवर्षी साधारण 50 लाख रुपयांचे उत्पन होत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
मियाझाकी आंबा लालसर केशरी रंगाचा असतो. यामध्ये बिटा कैरोटीन आणि फॉलीक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी आणि विटमिन ए भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि पचनसंस्थाही सुदृढ ठेवण्यास हा आंबा मदत करतो. नुकत्याच नांदेड येथील पार पडलेल्या कृषी प्रदर्शनात हा आंबा भाव खाऊन गेला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List