‘बिग बॉस 18’च्या विजेत्यामुळे अभिनेत्रीचा घटस्फोट? 15 वर्षांचा संसार मोडल्याबद्दल म्हणाली..
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री बरखा बिष्टने अभिनेता इंद्रनील सेनगुप्ताशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 15 वर्षांनंतर या दोघांचा संसार मोडला. या दोघांना 13 वर्षांची एक मुलगी आहे. इंद्रनीलसोबतच्या घटस्फोटानंतर बरखाचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. बरखाचा खास मित्र आणि ‘बिग बॉस 18’चा विजेता करणवीर मेहराला बरखाच्या घटस्फोटासाठी जबाबदार ठरवलं गेलं. अभिनेता आशिष शर्मासोबतही तिच्या अफेअरच्या चर्चा होत्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द बऱखाने यावर मौन सोडलं आहे.
आरजे सिद्धार्थ कन्नला दिलेल्या मुलाखतीत बरखाने स्पष्ट केलं की सध्या ती कोमासोबतच रिलेशनशिपमध्ये नाही. “माझ्या आयुष्यात बरीच खास लोकं आहेत. जसं की करणवीर मेहरा. लोकांनी म्हटलं की माझं आणि करणचं अफेअर सुरू आहे. अनेकांनी त्यावरून मला ट्रोलसुद्धा केलं. तो बिग बॉसमध्ये असताना मी त्याला पाठिंबा देण्यासाठी गेली होती. तेव्हा अधिकच चर्चा झाली. अनेकांनी आरोप केले की करणमुळे माझा घटस्फोट झाला. कारण मी सतत करण-करण करायची. जेव्हा मी करणसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते, तेव्हासुद्धा लोक म्हणाले की हिचा पती हिला असे पोस्ट करायची परवानगी कशी देतो?”, असं ती म्हणाली.
बरखाने आशिषला तिचा जवळचा मित्र असल्याचं म्हटलंय. डेटिंगच्या चर्चांना नाकारत ती म्हणाली की, “मी कधीच माझे रिलेशनशिप लपवले नाहीत. सध्या माझं संपूर्ण लक्ष माझ्या मुलीवर आहे. मी एकटीच तिचं संगोपन करतेय. त्यामुळे डेटिंगबद्दल मी सध्या विचार करत नाहीये.”
बरखा आणि इंद्रनील यांचा 2022 मध्ये घटस्फोट झाला. इंद्रनीलचं बंगाली अभिनेत्री इशा साहासोबत अफेअर असल्यामुळे त्यांच्या संसारात समस्या निर्माण झाल्याचं म्हटलं जातं. याविषयी बरखाने सांगितलं, “इंद्रनीलने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामागची कारणं त्यालाच माहीत असतील. माझ्या हातात सर्व परिस्थिती असती, तर मी आजसुद्धा विवाहित असते. आम्ही एकमेकांसोबत खुश होतो. परंतु फसवणूक, अप्रामाणिकपणा, नात्यातून प्रेमच संपणं अशा गोष्टी घडत असतात. प्रत्येकाची आपापली निवड असते. फसवणूक आणि नात्यात प्रामाणिक न राहण्याचा निर्णय हा तुमचा असतो.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List