इराण अमेरिकेशी पंगा घेणार; ट्रम्प यांच्या बॉम्बवर्षावाच्या धमक्यांना दिले थेट प्रत्युत्तर
इराणने अणुकरारासा सहमती दर्शवली नाही, तर त्यांच्यावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात येईल. तसेच त्यांनी यापूर्वी कधीही अनुभवला नसेल, असा बॉम्बवर्षाव करण्यात येईल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला दिली होती. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर आता इरणनेही आक्रमक भूमिका घेतली असून थेट अमेरिकेला आव्हान दिले आहे. त्यामुळे इराण अमेरिकेशी पंगा घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इराणच्या सशस्त्र दलांनी अशी क्षेपणास्त्रे तयार केली आहेत जी जगभरातील अमेरिकेशी संबंधित ठिकाणांवर मारा करण्याची क्षमता ठेवतात. अमेरिकेने कोणतीही कारवाई केल्यास त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याची क्षमता असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. इराणच्या सरकारी मालकीच्या तेहरान टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणु करारावर इराणला बॉम्बवर्षावाची धमकी दिल्यानंतर काही तासांतच, इराणने आमचीही क्षेपणास्त्रे बॉम्बवर्षावासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट करत अमेरिकेला थेट आव्हान दिले आहे. इराणने तयार केलेल्या क्षेपणास्त्रांपैकी बरीचशी क्षेपणास्त्रे भूमिगत ठिकाणी असून गरज पडल्यास ती बाहेर काढण्यात येतील. ती क्षेपणास्त्रे कोणत्याही हवाई हल्ल्यांचा सामना करण्यास सक्षम आहेत. तसेच अत्याधुनीक पद्धतीने ती डिझाइन केलेली आहेत, असा दावा इराणकडून करण्यात आला आहे.
ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेने 2015 च्या संयुक्त व्यापक कृती आराखड्यातून इराणवर निर्बंध कमी करण्याच्या बदल्यात त्यांच्या अणु उपक्रमांवर कठोर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. आपले प्रशासन इराणसोबत चर्चेसाठी तयार आहे. मात्र, इराणने त्यांचा अणुकार्यक्रम मर्यादित करण्यासाठी वचनबद्धता राखली पाहिजे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इराणचे नवनिर्वाचित अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी आपल्या निवेदनात ट्रम्प यांच्या वक्तव्यावर मत व्यक्त केले. इराणने वॉशिंग्टनशी थेट वाटाघाटी करण्याचे नाकारले आहे. तसेच ओमानच्या मध्यस्थीने केलेल्या अप्रत्यक्ष वाटाघाटी सुरू राहू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही वाटाघाटी टाळत नाही. मात्र, त्यांच्या अविश्वासूपणामुळे आम्हाला आतापर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहेत. आधी त्यांनी विश्वास संपादित करावा, तसेच करारातील अटींप्रमाणे पालन होईल, याची ग्वाही द्यावी, असेही पेझेश्कियान यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List