तुम्हाला घनदाट, निरोगी, काळेभोर केस हवे आहेत ना! मग करा हे साधे सोपे घरगुती उपाय, वाचा सविस्तर
सध्या केस पातळ होण्याची समस्या ही अगदी सर्वसामान्य झालेली आहे. काहीजणांचे केस हे नैसर्गिक पातळ असतात. अनेकदा केस हे प्रदूषण, पोषक तत्वांचा अभाव, हार्मोनल असंतुलन, ताण किंवा केसांची योग्य काळजी न घेण्यामुळे केस तुटू लागतात आणि पातळ होतात. पातळ केसांमुळे, कोणत्याही प्रकारची हेअरस्टाइल शोभत नाही. म्हणूनच काही घरगुती उपायांचा अवलंब केला तर केस हमखास घनदाट आणि निरोगी होतील.
केस घनदाट होण्यासाठी घरगुती उपाय
मेथी दाणे
केस घनदाट करण्यासाठी मेथीचे दाणे हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. मेथीच्या बियांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. मेथीच्या दाण्यांमध्ये प्रथिने आणि लोहाचे प्रमाण जास्त असते, हे केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. मेथीचे दाणे केसांना लावल्याने केस गळणे, कोंडा होणे तसेच केस पातळ होण्यावर प्रभावी उपचार आहे.
याकरता खोबरेल तेल गरम करा. दोन चमचे मेथीचे दाणे घालून ते उकळा. नंतर ते थोडे थंड होऊ द्या. हे तेल तुमच्या टाळूवर आणि केसांना लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. एक तासानंतर केस शाम्पूने धुवा. असे केल्याने तुमचे केस जाड होतील.
जवस
केस घनदाट होण्यासाठी जवस खूप फायदेशीर आहे. जवसामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, प्रथिने आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडसारखे पोषक घटक असतात. जवस हे केसांच्या मूळांना मजबूत करतात. त्यामुळे केस तुटण्याची समस्या कमी होते. जवस हे केसांच्या वाढीसाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे.
जवसाचे तेल हलके गरम करा. ते टाळू आणि केसांवर लावावे त्यानंतर हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर हे तेल एक तास तसेच डोक्याला ठेवावे. नंतर शाम्पूने नेहमीप्रमाणे केस धुवावे. नियमितपणे हा उपाय केल्याने, केस घनदाट आणि जाड होतील.
आवळा
आवळा हा केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, यामुळे केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. केस घनदाट करण्यासाठी आवळा खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अमीनो आम्ल आणि अँटिऑक्सिडंट्ससारखे अनेक पोषक घटक आढळतात. आवळ्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. तसेच आवळ्यामुळे केस तुटण्याचे प्रमाण खूप कमी होते. आवळा केसांना लावल्याने केस जाड तर होतातच पण केसांची लांबीही चटकन वाढते.
आवश्यकतेनुसार ऑलिव्ह ऑइल गरम करा. त्यात एक चमचा आवळा पावडर घाला आणि उकळवा. नंतर ते गाळून थंड करा, त्यानंतर हे मिश्रण टाळू आणि केसांवर हलक्या हाताने लावा. काही वेळ मालिश करुन, नंतर एक किंवा दोन तासांनी केस शाम्पूने धुवा. हा उपाय नियमितपणे केल्याने तुमचे पातळ केस जाड आणि घनदाट होतील.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला न विसरता घ्या. )
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List