‘मनाई असताना हॉटेल रुममध्ये सिगारेट्स..’; नेहा कक्करचा आयोजकांकडून पर्दाफाश, शेअर केला व्हिडीओ
प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर तिच्या ऑस्ट्रेलिया टूरमुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात नेहाच्या म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्सर्टला नेहा तब्बल 3 तास उशिरा पोहोचली होती. त्यानंतर भडकलेल्या श्रोत्यांनी तिला परत जाण्यास सांगितलं होतं. स्टेजवर रडतानाचा आणि श्रोत्यांना विनंती करतानाचा नेहाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. नंतर तिने या सर्व गोष्टींचं खापर आयोजकांवर फोडलं होतं. आता नेहाच्या आरोपांनंतर आयोजकांनीही तिच्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. कॉन्सर्टचं आयोजन करणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसने याप्रकरणी एक पोस्ट शेअर केली आहे. नेहाने आयोजकांवर जे आरोप केले होते, ते साफ नकारत त्यांनी तिचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. नेहा हॉटेलच्या अशा रुम्समध्ये सिगारेट्स ओढत होती, जिथे स्पष्ट मनाई होती, असं त्यांनी म्हटलंय. याचं सत्य दाखवणारा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी पुन्हा एकदा नेहावर भडकले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण गेल्या आठवड्यात घडलंय. गायिका नेहा कक्करला 23 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात एका कॉन्सर्टसाठी बोलावलं होतं. त्यासाठी नेहा तिच्या टीमसोबत ऑस्ट्रेलियाला पोहोचली होती. परंतु शोमध्ये ती तब्बल तीन तास उशिरा पोहोचली होती. मंचावर पोहोचलेल्या नेहाला उपस्थित श्रोत्यांनी थेट ‘परत जा’ असं म्हटलं होतं. श्रोते ऐकायलाच तयार नसल्याने नेहाला मंचावर अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोलिंग झाल्यानंतर नेहाची तिची बाजू मांडली. नेहाचा भाऊ टोनी कक्कर यानेसुद्धा आरोप केले होते की नेहासाठी हॉटेल आणि ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्यात आली नव्हती. यामुळेच तिला कॉन्सर्टच्या स्थळी पोहोचण्यास उशिर झाला होता. याशिवाय नेहाने आयोजकांवर पैसे न दिल्याचा आरोप केला. त्यामुळे सर्व चूक आयोजकांचीच होती, असं नेटकऱ्यांना वाटलं होतं. आता याप्रकरणी आयोजक ‘बीट्स प्रॉडक्शन’ने आपली बाजू समोर आणली आहे.
नेहाचा पर्दाफाश?
‘बीट्स प्रॉडक्शन’ने नेहाची पोलखोल केली आहे. त्यांनी नेहा आणि तिच्या स्टाफच्या हॉटेल रुम्सचे बिल आणि खाण्यापिण्याचे बिल शेअर केले आहेत. त्याचसोबत नेहाच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे. कॉन्सर्टच्या स्थळी पोहोचण्यासाठी कोणत्याच प्रकारचा ट्रान्सपोर्ट उपलब्ध नव्हता, असा आरोप नेहाने केला होता. आता बीट्स प्रॉडक्शनने शेअर केलेल्या या व्हिडीओत पहायला मिळतंय की नेहा बाहेर निघताच चाहत्यांची भेट घेते आणि फोटो क्लिक करून गाडीत बसते. या गाडीच्या मागे इतरही अनेक गाड्यांचा ताफा पहायला मिळतो. नेहाच्या मेलबर्न आणि सिडनी कॉन्सर्टमुळे जवळपास 529,000 डॉलरचं (4.52 कोटी रुपये) नुकसान झाल्याचा दावा आयोजकांनी केलाय.
प्रॉडक्शन कंपनीने असाही दावा केलाय की सिडनी, मेलबर्न आणि पर्थमध्ये क्राऊन टावर्सने तिच्यावर बंदी आणली आहे. कारण एका हॉटेलमध्ये नेहा स्मोकिंग करत होती. हॉटेलच्या रुम्समध्ये स्मोकिंग करण्यास सक्त मनाई होती. ऑयोजकांनी एक चलानसुद्धा शेअर केला आहे आणि लिहिलंय, ‘क्राऊन टावर्स सिडनीला कॉल करा आणि विचारा की हॉटेलच्या रुममध्ये कोणी स्मोकिंग केली होती.’
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List